मुंबई: महाराष्ट्रातील 106 नगरपंचायंती, भंडारा आणि गोंदियातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, यासह सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक आणि शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागा यासह ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं राज्यातील राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मंत्री आणि आमदारांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, कृषी मंत्री दादा भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, सेना नेते रामदास कदम, जळगावात एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे, रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे, खासदार प्रफुल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

अधिक वाचा  OBC आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन ,आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगावात एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जळगावातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानं ही निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला
नाशिकच्या दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची लढत होत आहे.

अनिल परब आणि रामदास कदम दापोली मंडणगडमध्ये कुणाचं वर्चस्व

रत्नागिरीमध्ये दापोली मंडणगडमध्ये शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवडणुकीची सूत्र हाताळली. इथं राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होती. मात्र, शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

अधिक वाचा  “जे काम एके-४७ च्या गोळ्या करू शकल्या नाहीत ते….”;पंजाबचे सर्वोच्च नेते सुनील जाखड भाजपामध्ये दाखल

साताऱ्यात शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस

सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायतीमध्ये शिवसेना नेते गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या पॅनेलमध्ये निवडणूक होतं आहे. तर दुसरीकडे कोरेगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

रोहित पवार की राम शिंदे कर्जत कुणाकडे?

अहमदगरमध्ये कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. निवडणूक प्रचारात दोन्ही नेत्यांनी जोर लावला होता. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

अधिक वाचा  जर महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर आणखी मातीत जाईल, पडळकरांची पवारांवर जहरी टीका

देहूगावमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला

पुण्यातील देहूमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या देहू नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली असून यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.

भंडारा जिल्ह्यात काँग्रेस की राष्ट्रवादी

भंडारामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भाजप या ठिकाणी किती यश मिळवणार हे पाहावं लागेल.

तासगावात रोहित पाटील यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर .पाटील यांचा मुलगा रोहित पाटील सांगलीतील तासगाव नगरपंचायतीसाठी उभे राहिले आहेत. रोहित पाटील यांच्या विरोधात इतर राजकीय पक्षांचं आव्हान आहे.