मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या व्हिडीओत नाना पटोले हे मोदींना मारण्याची आणि शिव्या देण्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत पटोलेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे. तर तिकडे नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे.
गडकरींनीही केली पटोलेंच्या अटकेची मागणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gakari) यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हटलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी.”
चंद्रशेखर बावनकुळे यांची पोलिसांत तक्रार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.
देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नेते आनंदराव राऊत, अजय बोढारे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीसांनीही फटकारले
भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तर, ‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते‘ असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले आहे.
‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. ‘काँग्रेस पक्षात चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटना? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते‘ अशी टीका फडणवीस यांनी केली.
नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघात लोकांशी बोलताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नाना पटोले यांनी आज गडचिरोलीत बोलतांना खुलासा केला. ‘जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे, लोक माझ्या बाजूला गोळा झाले आहे. सध्या आमच्या जिल्ह्यात निवडणुका सुरू आहे आणि त्या प्रचारादरम्यान लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे मी त्या गावगुंडाला बोलू शकतो वेळ आली तर मारू सुद्धा शकतो, तुम्हाला काही घाबरण्याचे कारण नाही, असं आश्वासन दिले होते. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, असा खुलासा पटोले यांनी केला.