कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी आरोग्य कोठीकडे काम करणारे कर्तव्यदक्ष मोकादम वैजीनाथ गायकवाड व डहाणूकर कॉलनी मध्ये गेली चाळीस वर्ष वर्तमानपत्र विक्री करणारे व सर्वांच्या परिचयाचे संजय उभे यांनी चिनी मांजाला अडकलेल्या कबुतराची सुटका करून प्राण वाचवले. डहाणूकर कॉलनी गल्ली नंबर ९ मधील प्रिमरोज सोसायटी मध्ये राहाणार्‍या कर्तव्यदक्ष व जागृक माहिला नागरिक मा. सुजाता शर्मा यांनी सकाळी पहाटे ५.४५ वाजता फिरायला जात असताना मांजाला अडकलेल्या जिवाच्या आकांताने तडफडत असलेल्या कबुतराकडे लक्ष गेले. सदर कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी सौ. शर्मा यांनी महानगरपालिकेचे मोकादम वैजीनाथ गायकवाड यांना त्वरित फोन करून मांजाला कबुतर अडकल्याची माहिती दिली.

अधिक वाचा  अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने नागपूरकरांकडून पैसे घेतले नाही, कारण…नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा

सदर घटनेची माहिती मिळताच वैजीनाथ गायकवाड यांनी वर्तमानपत्र विक्रेते संजय उभे यांना बरोबर घेऊन त्वरित घटना स्थळी पोहोंचले. मांजाला अडकलेले कबुतर ७० फुट उंचावर तडफडत होते त्यामुळे प्रसंगावधान राखून पक्षी मित्राला व अग्निशामकदल केंद्रावर फोन करून माहिती दिली. पक्षी मित्राची व अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत कबुतराची सुटका करता येईल का? याचा विचार करून श्री वैजीनाथ गायकवाड व संजय उभे यांनी कृतिका सोसायटीचे वॉचमन यांना टेरेसचे कुलूप उघडण्यास सांगितले. स्वतः या दोघानी १५ फूट लांब बांबूच्या टोकाला तारेची आकडी करून बांधली. त्या बांबूच्या साह्याने टेरेस वर जाऊन कबूतर अडकलेल्या मांजाला अडकवून सावकाश ओढून काढण्यात आले तसेच बांबू ओढत असताना हाताच्या जवळ आलेल्या कबुतराने अडकलेल्या पंखाची सुटका करून घेतली व भूर्रकन उडून गेले.

अधिक वाचा  ‘वंचित’ची भूमिका काय? महाविकास आघाडीची साथ, स्वतंत्र लढणार की तिसऱ्या आघाडीची स्थापना

अग्निशमन दलाची गाडी येण्याच्या आधी सदर कबुतराची सुटका करून प्राण वाचवले. या घटनेची माहिती मिळताच तेथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळू दांडेकर, व्यापारी संघाचे श्री. शशीकांत उभे यांनी श्री. उभे व गायकवाड यांचे कौतुक केले.