शाळेत लहान मुलांची भांडणे झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. लहान मुलांच्या या भांडणांमुळे शिक्षकांच्या नाकी नऊ येतात. तर कित्येक वेळा शाळेतील या भांडणांमध्ये पालकांनादेखील हस्तक्षेप करावा लागतो. सध्या मात्र एका वेगळ्य़ा भांडणाची चर्चा होत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात विद्यार्थी नव्हे तर चक्क शिक्षकांनीच शाळेतील पोरांसारखे भांडण केले आहे. या भांडणात शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला आहे. शिक्षक-मुख्याध्यापकाच्या या वादाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

मुख्याध्यापक थेट शिक्षकाच्या अंगठ्याला चावला

मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून हे भांडण झाले आहे. शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. नंतर या वादाचे रुपांतर भांडणात झाले. हे भांडण नंतर ऐवढे टोकाला गेले की यामध्ये शाळेचा मुख्याध्यापक थेट शिक्षकाच्या अंगठ्याला चावला. येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळ येथील मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी हा चावा घेतला आहे. तर ब्रह्मचैतन्य राजगुरू असे शाळेतील उपशिक्षकाचे नाव आहे.

अधिक वाचा  मोठा निर्णय, पुण्यासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर

फिर्यादीनुसार गुन्हा दाखल

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील हे भांडण थेट पोलिसांपर्यंत गेले आहे. मुख्याध्यापकाच्या या हल्ल्यात शिक्षक राजगुरु यांच्या अंगठ्यातून रक्त आल्याने तेथे जखम झाली आहेत. शिक्षकाने मुख्याध्यापक यांच्या विरोधात येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकराणाचा पुढील तपास करत आहेत.

शिक्षक-मुख्याध्यापकाच्या भांडणामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया
दरम्यान, शिक्षक हे विद्यार्थ्यांना संस्कार देत असतात. मुलांचे भविष्य घडवतात असतात. त्यांना योग्य दिशा देत देशाच्या प्रगतीत शिक्षक मोलाचे सहकार्य करत असतात. मात्र शिक्षक-मुख्याध्यापकाने अंगठा चावेपर्यंत भांडण केल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.