मुंबईः महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना मराठी पाट्या न लावण्याची सूट आता कायद्यातील पळवाट म्हणून वापरता येणार नाही. सरसकट सर्व दुकानांच्या पाट्या आता मराठी भाषेत असतील,अशी सुधारणा आता यासंदर्भातील कायद्यात केली जाणार असून या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचं आहे. ते लाटण्याचा आचरटपणा कुणीही करू नये, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होऊ द्या, अशी सूचना केली आहे.

अधिक वाचा  मुंबईत भीषण दुर्घटना: ताडदेव परिसरात 20 मजली इमारतीला लागली आग.

राज ठाकरे यांनी काढले पत्रक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक पत्रक काढले असून त्यात राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरं तर आंदोलन करावं लागूच नये, परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच, असा मजकूर राज ठाकरे यांनी या पत्रकात लिहिला आहे.

अधिक वाचा  एका आयटम नंबरसाठी तब्बल एवढे मानधन घेतात या अभिनेत्री

राज ठाकरे म्हणतात, आणखी एक भानगड…

राज ठाकरे यांनी जारी केलेल्या याच पत्रकात पुढे म्हटले आहे की, हा निर्णय घेताना सरकारनं आणखी एक भानगड करून ठेवली आहे. मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.