नवी दिल्ली :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे सगळ्यांचच लक्ष होतं. कारण यावेळी एकूण उमेदवारांपैकी ४० टक्के उमेदवारी ही महिलांना देण्याचं वचन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिलं होतं. त्यानुसार काँग्रेस पक्षानं निवडणुकांसाठी पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून दिलेल्या आश्वासनानुसार यातल्या ५० मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये उन्नाओ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला देखील उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीवर 2017 मध्ये बलात्कार झाला होता. या प्रकरणात भाजप नेता कुलदीप सिंग सेनगरला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निर्भया प्रकरणानंतर उन्नाव बलात्कार प्रकरण देशभरात गाजलं होतं. काँग्रेसनंही हा मुद्दा उचलून धरला होता. विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्ला केला होता. प्रियांका गांधी यांच्यासह राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून योगी सरकारला धारेवर धरले होते.

अधिक वाचा  संसदेच्या नव्या इमारतीला मराठी कलासाज; या कलावंताची निवड

आता काँग्रेसने थेट पीडितेची आई आशा सिंग यांना तिकीट देत निवडणुकीतही हा मुद्दा आणला आहे. त्याचप्रमाणे सोनभद्रमधील जमीन वादातून पुढे आलेले आदिवासी नेते रामराज गोंड यांनाही काँग्रेसने उमेदवारी देत आदिवासींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. गोंड हे सोनभद्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत 10 फेब्रुवारी व सात मार्च या कालावधीत मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. तर भाजपने 325 जागा मिळवत राज्यात सत्ता मिळवली. समाजवादी पक्षाला 47 आणि बसपला 19 जागांवर समाधान मानावे लागले होते.

अधिक वाचा  कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार (DCGI)ची परवानगी