पणजी: येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल र्पीकर (४०) हे प्रयत्नशील आहेत. राजधानी पणजीतून उमेदवारीसाठी दावेदार आहेत. तीनवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले मनोहर र्पीकर हे पाच वेळा पणजी मतदारसंघातून निवडून आले होते. केवळ पक्षनेत्यांची मुले आहेत म्हणून उमेदवारांना भाजप उमेदवारी देत नाही, असे भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

‘भाजपला गोव्यात रुजवण्यासाठी मनोहरभाईंनी खूप काम केले. पण भाजपमध्ये केवळ कुणा नेत्याचा मुलगा आहे म्हणून कुणालाही उमेदवारी मिळत नाही. त्यांनी काम केले असेल, तर त्यांचा विचार करण्यात येतो. या संबंधात मी निर्णय घेऊ शकत नाही. केवळ आमचे संसदीय मंडळ हा निर्णय घेऊ शकते’, असे फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार (DCGI)ची परवानगी

गोव्यात भाजपला सत्तेवर आणण्यात प्रमुख भूमिका बजावणारे र्पीकर हे २००० साली पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते. त्यांच्याशिवाय पक्ष प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. पर्रिकर हेच गोवा भाजपचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यामुळे आताही राज्यात दौऱ्यावर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या प्रत्येक नेत्याने आपल्या प्रत्येक भाषणात पर्रिकर यांचा नामोल्लेख केलेला आहे. मात्र, पर्रिकर यांच्याशिवाय पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही, असे आगामी निवडणुकांपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या भाजपच्या ४ आमदारांनी म्हटले आहे.

पर्रिकर यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले उत्पल हे दिवाळीपासून पणजीत लोकांना भेटत आहेत, मंदिरांना भेट देत आहेत, तसेच राजधानातील फलकांवर झळकत आहेत. भाजप आपल्याला पणजीतून उमेदवारी देईल अशी आपली खात्री असल्याचे त्यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या बाबुश मोन्सेरात यांनी ही जागा जिंकली. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसमधील जे दहा फुटीर भाजपमध्ये आले त्यात मोन्सेरात यांचा समावेश होता. त्यामुळे आता मोन्सेरात यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. ते प्रचाराला सुरुवातही करणार होते मात्र उमेदवार जाहीर झाला नसल्याने त्यांनी प्रचार सुरु केलेला नाही. पणजीचे प्रतिनिधित्व करावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे उत्पल यांनी नमूद केले.