नवी दिल्ली : भैय्या हमारे बीच की ये दीवार तुटती क्यूं नहीं हे, असं म्हणणारे बोमन इराणी तुम्हाला लगेच आठवले असतील. आठवायलाच हवेत. कारण अंबुजा सिमेंट सारखीच एक भयंकर भिंत दोन भावांच्या नात्यात उभी ठाकली होती. या भींतीचं नाव होतं फाळणी! पण कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर फाळणीची ही भिंत कोसळली. भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी विभक्त झालेले दोन भाऊ तब्बल 74 वर्षानंतर भेटल्याचा हा व्हिडीओ आहे. कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर या दोन भावांची भेट झाली आणि या गळाभेटीनंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा आपसूक पाणावल्या!

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर दोन भावांची भेट होत आहे. व्हिडीओतून मिळत असलेल्या माहितीनुसार हे दोन्ही भाऊ भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी विभक्त झाले होते. त्यानंतर तब्बल 74 वर्षांनी या दोन भावांची भेट झाली आणि गळाभेट घेतल्यानंतर हे दोन्ही भाऊ ढसाढसा रडले. या दोन भावांची भेट पाहून उपस्थित लोकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. हा व्हिडीओ इतका भावूक आहे की तो पाहून लोकही भावूक होत आहेत. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि भावनिक कमेंट्सही करत आहेत.

दोन्ही भावांची अश्रूंना मोकळी वाट!

अधिक वाचा  अमोल कोल्हेंच्या पाठीशी...अजित पवारही; 'जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही'

पाकिस्तानी मीडिया हाऊस एआरवॉय न्यूजच्या रिपोर्टनुसार, 80 वर्षाचे मोहम्मद सिद्दीकी पाकिस्तानातील फैसलाबाद शहरात राहतात. ते फाळणीवेळी आपल्या परिवारापासून वेगळे झाले. त्यांचे भाऊ हबीब उर्फ शेला भारतात पंजाबमध्ये राहतात. कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर तब्बल 74 वर्षानंतर नियतीने ही भेट घडवून आणली. या भेटीनंतर या दोन्ही भावांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

हजारो लाईक्स आणि भावनिक कमेंट्स

दोन भावांच्या नात्याचं पावित्र्य सांगणारा हा व्हिडीओ @Gagan4344 नावाच्या ट्विटर यूजरने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. एका युजरने कमेंटमध्ये हा व्हिडीओ खरच हृदयस्पर्शी असल्याचं म्हटलंय. तर एकाने रडायला लावणारा व्हिडीओ असल्याचं म्हटलंय.