येरवडा येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यातील राडारोडा तात्काळ उचलून उद्यानात असलेले कंपांऊंड तसेच इतर दुरूस्तीची कामे तात्काळ करून त्याचा आहवाल सादर करा, अशा सुचना राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका आणि वनविभागाला दिल्या.

सलिम अली पक्षी अभयारण्यातील दुरवस्थेबद्दल शहरातील पर्यावरणप्रेमी आणि पक्षी तज्ञांनी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांची भेट घडवून आणण्याची विनंती शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांना केली होती. या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सचिन अहिर, शहर प्रमुख गजानन थरकुडे महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, वनसंरक्षक राहुल पाटील, निवासी जिल्हाधिकारी हिम्मत खराडे, सलिम अली अभयारण्य बचाव समितीचे सदस्य समिर निकम, मेघना बाफना, धर्मराज पाटील, महेश गवडीळ, सत्यम् नटराजन, पोर्णिमा जोशी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे विद्यापीठाला ऑफलाईन परीक्षा घेता येणार राज्य शासनाची मान्यता

अदित्य ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींशी चर्चा करून अभयारण्यामधील परिस्थितीची माहिती घेतली. अभयारण्यात पडलेला राडारोडा तात्काळ उचलण्याच्या सुचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. वॉल कंपांऊंड तसेच पक्षी सुरक्षा आणि अनुषंगीक कामे वनविभाग आणि महापालिका यांनी संयुक्तपणे पुर्ण करावेत असे सांगितले. त्यावर आयुक्त विक्रम कुमार यांनी 31 जानेवारीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करू असे त्यांनी सांगितले. अभयारण्यामध्ये वनविभागाच्या अधिकाऱयांनी वेळोवेळी भेटी देऊन पर्यावरण प्रेमींशी चर्चा करावी, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्याचे पर्यावरण चांगले राहिले पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न असतील. त्यासाठी पर्यावरण प्रेमींची मदत मला हवी आहे. या अभयारण्यामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, येत्या आठवडय़ाभरात केलेल्या कामांचा अहवाल मला पाठवावा. पुढील बुधवारी पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार असल्याचे अदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.