मुंबई : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीआधीच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. समाजमाध्यमांवर ही यादी आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले होते. दरम्यान, बाहेर आलेली यादी ही खोटी असून कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच अशी खोटी यादी कोणी आणि का पसरवली याचा शोध घेण्याचे तसेच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं ?
मुंबई पोलिसांची मनुसख हिरेन तसेच अँटिलिया स्फोट प्रकरणात मोठी बदनामी झाली. याच प्रकारणाचा आधार घेत विरोधक महाराष्ट्र पोलीस तसेच सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करत आले आहेत. राज्य सरकार हे वसुली सरकार आहे. पैसे देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असा आरोप विरोधक सातत्याने करतात. असे असताना आता मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नसलेली पोलिसांच्या बदल्यांची एक कथित यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही यादी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले होते.

अधिक वाचा  वारजेतील मनपा कुस्ती संकुल अर्धवटच; चोरांचा सुळसळाट, कुस्तीप्रेमींही निराश

गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सध्या बदल्यांचा कोणताही प्रस्ताव नाही. सध्या व्हायरल होत असलेली यादी पूर्णपणे चुकीची आणि खोटी आहे. कोणीतरी खोडसाळपणे हे काम केले आहे. याबाबत चौकशीचे आदेश आम्ही दिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी अशीच एक लिस्ट व्हायरल झाली होती. यावेळी तसाच प्रकार झाला आहे. याबाबत आम्ही चौकशी करु आणि दोषींविरोधात आम्ही कठोर कारवाई करु असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.