मुंबई : मुंबईमध्ये राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. मणिपूरमध्ये ५ ठिकाणी राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष एकत्रित लढणार आहेत. गोव्यामध्ये आघाडी करून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितरित्या निवडणूक लढवण्यासाठी चर्चा करत असल्याचेही शरद पवार म्हणाले.

उत्तरप्रदेशात यंदा परिवर्तन होणार असून ज्याप्रकारे सांप्रदायिक हिंसा व धर्माचे राजकारण उत्तरप्रदेशात केले जात आहे. त्यास लोक कंटाळले असून यावेळी परिवर्तन अटळ आहे. तसेच लोकांनाही बदल हवा आहे. असा विश्वास पवार यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केला.

अधिक वाचा  कंगनाची UP च्या राजकारणात एन्ट्री, एक फोटो शेअर आणि चर्चाच चर्चा!

गोव्यात देखील महाविकास आघाडी?

गोव्यामध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता असून गोव्यातील भाजप सरकारला हटवण्याची गरज आहे. गोव्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासाठी चर्चा करत असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच शिवसेनेव्यतिरिक्त काँग्रेस, तृणमूल या पक्षांशी देखील राष्ट्रवादीची देखील चर्चा सुरु असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रचार :

यंदा निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल प्रचार करण्यास मुभा दिली असून जनतेमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रचार करण्यास बंदी घातली आहे. याविषयी बोलताना पवार म्हणाले कि, ज्या पक्षाकडे या डिजिटल प्रचाराची प्रभावी यंत्रणा आहे त्यांना यामध्ये फायदा होईल. पर्यायाने भाजपला याचा अधिक फायदा होणार असल्याचे पवार म्हणाले. मात्र, उत्तरप्रदेशातील लोकांनीच आता बदल करण्याचे ठरवले असल्याने येथे भाजप सत्तेतून पायउतार होईल असे भाकीत देखील पवार यांनी केले. तसेच भाजपचे १३ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.