मुंबई : सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या चार दिग्गजांनी भारतीय क्रिकेट एकत्र गाजवले आहे. क्रिकेट विश्वात फॅब ४ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दिग्गजांपैकी तीन जण सध्या टीम इंडियासाठी पुन्हा काम करत आहेत. त्याचवेळी या सर्वांमधील ज्येष्ठ सचिनलाही टीम इंडियासोबत जोडण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.

बीसीसीआय  सचिव जय शहा हे सचिनच्या संपर्कात असून ते सचिनने भविष्यात भारतीय क्रिकेटमधील एखादी जबाबदारी घ्यावी, यासाठी प्रयत्न करत आहेत, असे वृत्त आहे. दोन दशकांहून जास्त काळ क्रिकेट खेळलेल्या सचिनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सर्वात महान खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. सचिन निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर म्हणून सक्रीय आहे. त्याचवेळी भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी त्याने मोठी भूमिका पार पाडावी यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.

अधिक वाचा  तुमचा मृत्यू केव्हा... आता डोळे सांगणार? संशोधकांचा एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम विकसित

टीम इंडियाच्या हेड कोचपदी राहुल द्रविड तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) संचालकपदी लक्ष्मण सध्या काम करत आहे. त्यांनी जबाबदारी घेतल्यापासूनच सचिनच्याही एन्ट्रीची फॅन्सना प्रतीक्षा आहे. सचिननं भारतीय क्रिकेटमध्ये आणखी योगदान द्यावं अशी इच्छा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार जय शहा सध्या सचिनला नव्या जबाबदारीसाठी तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत. द्रविड आणि लक्ष्मण यांचं मन वळवण्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती. ‘जय शहा मीडियाच्या रडारपासून दूर आहेत. पण काय करायचं आहे, याबाबत त्यांचे धोरण स्पष्ट आहे. लहान गोष्टी निर्णायक ठरतात. द्रविडला हेड कोच म्हणून नियुक्त करणे किंवा लक्ष्मणसारख्या दिग्गजानं एनसीएची जबाबदारी सांभाळणे हे याचे उदाहरण आहे. आमच्या माहितीनुसार सचिनने भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी एखादी भूमिका पार पाडावी याबाबत ते प्रयत्न करत आहेत,’ अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.