नवी दिल्ली : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर NEET PG काउन्सलिंगची  तारीख अखेर जाहीर झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी NEET PG प्रवेशासाठी प्रक्रिया 12 जानेवारी 2022 पासून काउन्सलिंग सुरू होईल अशी घोषणा केली आहे. NEET PG काउन्सलिंगवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने NEET-PG प्रवेशासाठी काउन्सलिंग सुरू करण्याचे आणि 27 टक्के OBC कोटा कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीत ओबीसींना 27 टक्के आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून काउन्सलिंगची प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सुनावणीनंतर कोर्टाने काउन्सलिंगची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे सांगत अंतरिम आदेश दिले.

अधिक वाचा  राज्यातील ७ जिल्ह्यांत कोरोनाबाधित प्रचंड वाढ

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्टया मागास घटकासाठी आरक्षण  मान्य केले असले तरी आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेससंबंधीचा निर्णय मार्च महिन्यात देणार असल्याचे सांगितले आहे. सध्या जुने निकष लावून काऊन्सलिंग सुरु करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही बाधा येऊ नये यासाठी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण कायम ठेवण्यात येणार आहे. तसंच पांडेय समितीच्या शिफारशी पुढील वर्षापासून लागू करण्यास मंजुरी देत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसंच पीठाने मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात याचिकेवरील अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी इडब्ल्यूएस क्रायटेरियाची वैधता ठरवली जाणार आहे.

अधिक वाचा  हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी 5 फेब्रुवारीला सुनावणी