पंजाबमधील फिरोजपूर येथे ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या प्रकरणी, न्यायालयाच्या देखरेखीखालील चौकशीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हेमा कोहली यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठ लॉयर्स व्हॉईस या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग करणे ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या नाही, हे विशेष संरक्षण गट (SPG) कायद्यांतर्गत येते.

अधिक वाचा  कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: आरोपी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द

पंतप्रधानांच्या सुरक्षेचे उल्लंघन ही राज्य सरकारची जाणीवपूर्वक केलेली चूक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या चुकीसाठी पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी गुरुवारी या प्रकरणाचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला आणि ही गंभीर चूक असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हेमा कोहली यांच्या खंडपीठाने पंजाब सरकारला मनिंदर सिंग यांच्यावतीने याचिकेची प्रत देण्यास सांगितले. पंतप्रधानांच्या ताफ्याला रस्त्यावर अडकू देणं ही पंजाब सरकारची गंभीर चूक असल्याचं मनिंदर सिंग यांनी म्हटलं होतं.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला तपास करण्यापासून रोखले आहे

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यापासून रोखले आहे. यासोबतच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयास पंजाब सरकार, पोलीस व केंद्रीय यंत्रणांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या तीन दिवस अगोदरची सुरक्षेशी संबंधीची व्यवस्था व नोंदी तत्काळ मिळवण्याचे निर्देश दिले आहेत. या नोंदी सीलबंद कव्हरमध्ये सोमवारी न्यायालयात सादर करण्यास न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला सांगितले होते.

काय घडलं होतं?

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.