पुणे : करोना संसर्गाचे रुग्ण सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर वाढत असताना आता लहान मुलांमध्येही विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या १० मुलांपैकी सहा ते सात मुलांमध्ये आजाराची सौम्य लक्षणे दिसत असून चाचणी केली असता ही मुले करोनाबाधित येत असल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे.

करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग दिसण्याचे प्रमाण अत्यल्प होते. दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्येही संसर्ग झाल्याचे दिसून आले. बहुसंख्य मुलांमध्ये लक्षणे सौम्य राहिली, मात्र त्याचवेळी मुलांना मल्टीसिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम झाल्याचेही दिसून आले होते. ओमायक्रॉनमुळे राज्यात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मात्र लहान मुलांमध्येही संसर्ग आढळण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.

अधिक वाचा  अल्लू अर्जुनच्या ‘त्या’ दृश्यांवरून ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!

ज्येष्ठ बालरोगज्ज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, आठवडाभरापूर्वी १५ ते १८ वर्ष वयाच्या मुलांमध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, आता ज्या मुलांमध्ये करोनाचा संसर्ग दिसत आहे, ती मुले या वयोगटापेक्षा लहान आहेत. प्रामुख्याने चार ते आठ वर्ष वयाच्या मुलांमध्ये सध्या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग दिसत आहे. दहा मुलांच्या चाचण्या केल्या असता त्यांपैकी सहा ते सात मुलांमध्ये करोना असल्याचे दिसून येत आहे. मुलांमध्ये दिसणारी लक्षणे आजही सौम्य आहेत. मात्र, मुलांमधून पालकांमध्ये संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी घेणे योग्य ठरेल, असेही डॉ. आगरखेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  देहूच्या पहिल्या निवडणुकीत आमदार सुनिल शेळके यांची एकहाती सत्ता !

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, संपूर्ण कुटुंबाला लक्षणे आहेत, त्यात लहान मुलेही आहेत असे पाहण्यात येत आहे. मुलांच्या चाचण्या केल्या असता त्यांना करोनाचे निदान होत आहे. ही मुले प्रामुख्याने १५ वर्षांखालील वयोगटातील आहेत. साध्या औषधांनी ती बरीही होत आहेत, मात्र तरी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.

सौम्य लक्षणे,पण खबरदारी हवीच

लहान मुलांमधील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संजय मानकर म्हणाले, लहान मुलांना पहिले दोन दिवस तीव्र ताप येतो. त्यानंतर ताप कमी होतो. मात्र, डोके, पाय, पोट दुखणे, उलटय़ा ही लक्षणे दिसतात. अनेकदा भूक लागत नाही किंवा मंदावते. साध्या पॅरासिटॅमॉल सारख्या औषधाने ही मुले बरी होत आहेत. अद्याप रुग्णालयात दाखल होणे, प्राणवायूची गरज असलेली मुले दिसत नाहीत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, मात्र दुर्लक्षही क ्नू नये, असे आवाहनही डॉ. मानकर यांनी केले.

अधिक वाचा  विलक्षण प्रेमकहाणी 'पांघरुण' ट्रेलर प्रदर्शित

ही काळजी घ्या

* लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवा.

* मुलांना मुखपट्टी लावण्याबाबत जागरूक करा.

* घरातील कोणाला संसर्ग झाला असेल तर मुलांपासून अंतर राखा.

* घरी केलेले ताजे, पौष्टिक जेवण द्या.