पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी झालेला परीक्षांचा गोंधळ पाहता राज्य मंडळाला तयारी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत असून, राज्य मंडळ अद्याप ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहे.

राज्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्यात आल्या. सध्या केवळ दहावी आणि बारावीचेच वर्ग सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तिसऱ्या लाटेचे सावट दहावी-बारावीच्या परीक्षांवर निर्माण झाले आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचे मंडळाचे नियोजन आहे. मात्र परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. परिस्थितीनुसार परीक्षांबाबतचा निर्णय घेतला जाईल.

अधिक वाचा  वैवाहिक बलात्काराच्या वेदना दुर्लक्षितच; पतीचा जबरदस्तीचा संबंध वैधच

गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा गोंधळ झाला होता. तसेच काहीसे चित्र यंदाही आहे. या वेळेसही प्रत्यक्ष परीक्षा होऊ शकत नसल्यास कोणत्या पद्धतीने मूल्यमापन करता येईल याचा विचार आधीच करायला हवा होता. मात्र अद्याप तरी दुसऱ्या पर्यायाचा विचार केल्याचे दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा फार महत्त्वाच्या असल्याने मंडळाने पर्यायांची स्पष्टता दिली पाहिजे. – डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ