कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतच झुंज पाहण्यास मिळाली. तर भाजपने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला मदत केली. पण, राष्ट्रवादीने गड राखला असला तरी शिवसेना किंगमेकर ठरली आहे. सत्ताधारी गटातील 8 उमेदवार विजयी झाले आहे तर विरोधी गटातील 6 उमेदवार विजयी झाले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे. शिवसेनेनं काँटे की टक्कर दिल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली. 15 जागांपैकी सत्ताधारी गटाला 8 जागा जिंकता आल्या आहेत. तर विरोधी गटाने आतापर्यंत 6 जागांवर मुसंडी मारली आहे.

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता होती. पण, जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवली. तर भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत केली. सत्तारूढ गटाचे नेतृत्त्व बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं होतं, असं वृत्त आहे.

तर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्ताधारी गटाला कडवी झुंज दिली. अखेरीस विरोधी गटाने सहा जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता आता खासदार मंडलिक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अध्यक्षपद शिवसेनाच ठरवणार असल्याचे चित्र आहे. या निकालामुळे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे.