आळंदी : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले ‘दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले.बाळशास्त्री जांभेकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिन असल्याने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधत आळंदी डुडूळगाव येथील शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, ज्येष्ठ पत्रकार हनमंत पाटील, भाजप आध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय घुंडरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाॅ.हंसराज थोरात होते.

अधिक वाचा  पोलिसांच्या बदलीची यादी मुख्यमंत्र्यांच्या सही आधीच व्हायरल झाल्याप्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ रोजी दर्पण हे पाक्षिक काढले व पत्रकारांच्या समस्या मांडल्या. जांभेकर यांनी जी समाजहिताची निर्भीड पत्रकारिता सांगितली आहे, त्याच नीतिमूल्यांचे आचरण प्रत्येक पत्रकाराने करावे. तरच खऱ्या अर्थाने पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ ठरेल.ही आज काळाची गरज आहे. यावेळी सर्वच वक्त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनचरित्राबद्दल आपली मते व्यक्त केली.

याप्रसंगी आळंदीचे पत्रकार अर्जुन मेदनकर, श्रीकांत बोरावके, ज्ञानेश्वर फड, भानुदास पराड, दिनेश कुऱ्हाडे, हमीद शेख, दादासाहेब कारंडे, अनिल जोगदंड, विठ्ठल शिंदे, गौतम पाटोळे, अमोल काकडे, गणेश शिंदे, हनुमान घोंगडे, रामदास दाभाडे इत्यादी पत्रकारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष मयूर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

अधिक वाचा  ओमिक्रॉनवर येत आहे पुण्यात पहिली स्वदेशी लस

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.पांडुरंग मिसाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रा.दिलीप बारी यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रा.परमेश्वर भाताशे यांनी मानले. या कार्यक्रमाला शरदचंद्र पवार महाविद्यालय व रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती दर्शवली होती.या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.