चंदीगड : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटीला जबाबदार कोण? याबाबत सध्या चौकशीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंजाब सरकारने स्वतंत्र समित्या स्थापन करून याचा तपास सुरू केला आहे. पंतप्रधान मोदींचा दौरा शेतकरी आंदोलकांनी रोखल्याचे बोलले जात असतानाच आज संयुक्त किसान मोर्चाने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींच्या नियोजित दौर्‍याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या 10 शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु, मोदींचा ताफा रोखण्याचा, त्यांच्या कार्यक्रमात अडसर आणण्याचा कुठलाही बेत नव्हता. त्या दिवशी शेतकर्‍यांनी मोदींच्या ताफ्याकडे जाण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. उलट भाजपचा झेंडा हातात घेऊन ‘नरेंद्र मोदी झिंदाबाद’च्या घोषणा देणारेच ताफ्याजवळ पोहोचले होते, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

अधिक वाचा  'बॉस माझी लाडाची', नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अजय मिश्रांच्या अटकेसाठी राज्यभर निदर्शने
लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना अटक व्हावी तसेच इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 2 जानेवारीला संपूर्ण पंजाबमध्ये गाव पातळीवर आणि 5 जानेवारीला जिल्हा आणि तालुका पातळीवर निदर्शने आणि पुतळा दहन आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आम्ही शांततेत निदर्शने केली. पोलिस प्रशासनाने काही शेतकर्‍यांना फिरोजपूर जिल्हा मुख्यालयावर जाण्यापासून रोखले, तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यातील काही शेतकरी प्यारेयाणा फ्लायओव्हरवर गेले होते. त्या फ्लायओव्हरवरून पंतप्रधानांचा ताफा जाणार असल्याची आम्ही अजिबात पूर्वकल्पना नव्हती. पंतप्रधान माघारी गेल्याचे मीडियात बातम्या आल्यानंतर आम्हाला कळले. त्यामुळे मोदींच्या जीवाला धोका होता, असे म्हणणे चुकीचे आहे, असे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.

अधिक वाचा  माझ्या विरोधात जायचं तिकडे जावं; देश विकणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात आम्हीही जाणार - पटोले

विविध विकासकामांचे लोकार्पण करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पंजाब दौऱ्यावर गेले होते. खराब वातावरणामुळे त्यांनी भटिंडा विमानतळावरुन हेलिकॉप्टरने न जाता रस्ते मार्गाने फिरोजपूरला जाण्याचं ठरवलं. याच दरम्यान त्यांचा ताफा शेतकरी आंदोलकांच्या रास्ता रोकोमुळे उड्डाणपुलाजवळ जवळपास 20 मिनिटे खोळंबला. हा पंजाब पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचे उघडकीस आले. पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानच्या सीमेपासून साधारण 30 किमी अंतरावर जवळपास 20 मिनिटे थांबले होते. अतिसंवेदनशील भागात झालेला त्यांचा खोळंबा ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी असल्याचे बोलले जात आहे. याची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे.