पुणे  : राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या ‘टीईटी’ उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जाते. मात्र, ‘टीईटी’ परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने तुकाराम सुपेंसह आणखी काही जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ‘टीईटी’ उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची आता पडताळणी परीक्षा परिषदेकडून करण्यात येणार आह़े  हे काम अतितातडीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, या पडताळणीतून बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्या शिक्षकांचा शोध लागण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  नागराज मंजुळें नव्या लूकमध्ये ; ओळखणंही झाले कठीण

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले, की १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांची माहिती आणि मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी सात जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या पूर्वीही २०१९ मध्ये प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश देण्यात आले होते. सध्या सहाशे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता करण्यात येईल.

प्रकरण काय?

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी टीईटी परीक्षेत अपात्र उमेदवारांकडून दलालांमार्फत पैसे घेऊन परीक्षार्थीचे गुण वाढवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना २०१८ च्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून कोटय़वधींची रक्कम, दागिने ताब्यात घेतले आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या अनुषंगाने प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आह़े