पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ मेमध्ये संपत असल्याने नव्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यपाल कार्यालयाने विद्यापीठाला पत्र पाठवून राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीचे नाव सुचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाकडून नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेधनामध्ये विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक पारित करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांचे प्र कुलपतीचे पद आणि कुलगुरू निवड प्रक्रिया यातील हस्तक्षेप आदी मुद्दय़ांवरून या सुधारणांना विरोध होत आहे. विद्यापीठांमध्ये राजकीय आणि सरकारी हस्तक्षेप नको अशी भूमिका सातत्याने मांडली जात आहे. मात्र राज्यपालांनी या विधेयकाला मान्यता दिल्याशिवाय या सुधारणा विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार नाही. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरू निवड प्रक्रिया राबवली जाईल.

अधिक वाचा  बोगस 45 डॉक्‍टरांविरोधात गुन्हे महापालिकडून दाखल

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाल संपण्यापूर्वी नव्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्यपाल कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे.  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या सदस्यांची १० जानेवारीला बैठक होणार आहे. त्यात राज्यपाल कार्यालयाच्या सूचनेनुसार चर्चा करून राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तीचे नाव सुचवण्यात येईल. त्यामुळे विद्यापीठाकडून कोणाचे नाव सुचवले जाणार याबाबत उत्सुकता आहे.