पुणे :समता प्रतिष्ठान ७ वा वर्धापन दिन व सृजन फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…..! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद या महान सामाजिक योद्ध्यांच्या जयंतीचे निमित्त साधून समता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा ७ वा वर्धापन दिन पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्यालय श्रमिक भवन येथे साजरा करण्यात आला. गेली सात वर्षापासून समता प्रतिष्ठान ही एक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मंगळवार पेठेतील विशेषतः कष्टकरी वर्गाच्या मुला-मुलींना शैक्षणिक क्षेत्रामध्ये मदत करण्यासाठी अंगण प्रकल्पा अंतर्गत चार ठिकाणी अभ्यासिका वर्गाचे केंद्र विनामूल्य चालवत आहे.

या अभ्यासिका वर्गामधून विशेषतः गरीब कुटुंबातील मुला-मुलींना त्यांचा बौद्धिक विकास व्हावा तसेच त्यांच्या विविध कलागुणांचा विकास करण्यासाठी समता प्रतिष्ठानच्या वतीने विनामूल्य शिक्षण देणे व साहित्याचे वाटप करणे तसेच शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भुईकोट, डोंगराळ किल्ले, वेरूळ अजिंठा येथील लेण्यांची माहिती देऊन ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व व जतन करण्याचा वारसा ईत्यादीचे ज्ञान आधुनिक पिढ्यांना देण्याचे काम समता प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणित, इंग्रजी व विज्ञान या अवघड वाटणाऱ्या या विषयाची आवड निर्माण व्हावी त्यांना त्या विषयाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे म्हणून त्या अभ्यासिका वर्गात अतिशय सोप्या पद्धतीने तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची काम करत आहे. तसेच शैक्षणिक उपक्रमा सोबत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक वाढीसाठी योग वर्गाच्या माध्यमातून व्यायाम करण्याची आवड निर्माण करण्याचे काम समता प्रतिष्ठानचे संस्थापक व योग वर्ग शिक्षक श्री संदीप मोरे व त्यांचे कुटुंब करत आहे.

अधिक वाचा  इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार- नरेंद्र मोदी

या त्यांच्या शैक्षणिक उपक्रमामुळे विविध क्षेत्रात काम करणारे नामवंत व्यक्ती व सृजन फाउंडेशन या सामाजिक संस्था समता प्रतिष्ठानच्या कार्यात मदत करून मोलाचे योगदान देतात. सदर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व मिलिंद भोई प्रतिष्ठानचे संस्थापक व वैद्यकीय क्षेत्रात अल्पदरात सर्वसामान्य व कष्टकरी वर्गाच्या जनतेवर वैद्यकीय उपचार करणारे डॉ. मिलिंद भोई उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करत असताना डॉ. मिलिंद भोई असे म्हणाले की, “समता प्रतिष्ठानच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले तसेच सर्व सामान्य व कष्टकरी वर्गातील मुला मुलींना शिक्षण रूपी वाघीणीचे दुध पाजून सृजनशील नागरिकाची पिढी घडवण्याचे काम करत आहेत हे एक महान कार्य आहे ते त्यांनी करत रहावे भोई प्रतिष्ठान पूर्ण सहकार्य करेल आश्वासन दिले.” सदर कार्यक्रमात सृजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अमृता नेवसेकर, डॉ. मिलिंद भोई, युनियनचे कार्यालयीन चिटणीस वैजीनाथ गायकवाड व अन्य प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा  वारजेतील मनपा कुस्ती संकुल अर्धवटच; चोरांचा सुळसळाट, कुस्तीप्रेमींही निराश

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा रेश्मा लेंगर कारभारी यांनी केले. प्रास्ताविक समता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अपर्णा चव्हाण यांनी केले तसेच स्वागत गीत रेखा गायकवाड वनिता वाघमारे यांनी सादर केले. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन, स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक कार्याच्या गोष्टी शिवाय मुलींची गर्भपातच होणारी भ्रूणहत्या या विविध विषयावर गाण्यातून आपल्या व्यथा मांडल्या. या कार्यक्रमासाठी सृजन फाउंडेशन यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. शिवाय अमन शेख सौरभ वेळेकर, रिया उबाळे, सम्यक चव्हाण, सानिका सरोज, अथर्व तेलंगी, दीपक वारे, तेजस चलवादी, निशांत वाघमारे, अमृता मोरे, नरेश लालबिगे, राजश्री जाधव, पूजा कांबळे, ताई अर्जुन इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन नीता वाघमारे यांनी केले.