पुणे : पाषाण-पंचवटीपासून कोथरूडला जोडणारा प्रस्तावित बोगदा रस्ता उभारणीच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रस्तावित बोगदा मार्गाच्या कामासाठी पूर्व-व्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलिटी स्टडी) आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. कोथरुडमधील सुतारदरा ते पाषाण पंचवटी दरम्यान बोगदा तयार करून त्यातून रस्ता काढण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या बोगद्यचा समावेश शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखडय़ात करण्यात आलेला आहे. कोथरुड, औंध, बाणेर, पाषाण परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पाषाण-पंचवटी ते कोथरुड दरम्यानच्या प्रस्तावित बोगद्यसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) हद्दीमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिकेची या संपूर्ण मार्गाच्या आखणीसाठी तयारी सुरू आहे. प्रस्तावित बोगद्यचा मार्ग निश्चित झाल्यानंतर संरक्षण आणि वन विभागाच्या जागांसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मोनार्च सव्‍‌र्हेअर अॅण्ड इंजिनिअरिंग कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. पर्यावरणीय मूल्यांकन अहवाल आणि पूर्व व्यवहार्यता अभ्यासासाठी सल्लागार कंपनीला ७२ लाख ७० हजार रुपये शुल्क देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

अधिक वाचा  सहकार आयुक्तांची भाजपा सहकार आघाडी शिष्टमंडळाने घेतली भेट

दोन रस्ते नियोजित

महापालिकेच्या विकास आराखडय़ाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये शहराच्या दोन वेगवेगळ्या भागांना जोडण्यासाठी बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. सिंहगड रस्त्यावरून सहकारनगर-तळजाईकडे जाणारा एक बोगदा असून दुसरा बोगदा कोथरूड आणि पाषाण या भागाला जोडणार आहे. या दोन्ही बोगद्यंमुळे वाहनचालकांचे अंतर कमी होणार आहे.

नवीन सल्लागार

कोथरूड-पाषाण अंतर चांदणी चौकामार्गे आठ किलोमीटर एवढे आहे. तर सेनापती बापट रस्ता मार्गे साडेनऊ किलोमीटर एवढे आहे. बोगदा पूर्ण झाल्यानंतर अंतर चार किलोमीटरने कमी होणार आहे. पंचवटी ते कोथरूड बोगद्यची लांबी एकूण १ हजार ९० मीटर एवढी आहे. तर पंचवटी ते गोखलेनगर बोगद्यची लांबी ५८० मीटर एवढी प्रस्तावित आहे. या कामासाठी महापालिकेने यापूर्वी सल्लागाराची नियुक्ती केली होती. मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्याने नवा सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा  मृत कट्टर शिवसैनिक रुईकरांच्या घराचे भूमिपूजन; एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला

बोगद्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध

कोथरूड येथील सुतारदरा आणि पाषाण येथील पंचवटी या दरम्यान बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्यमुळे कोथरूडहून पाषाण, बाणेर, औंधकडे जाणे सुलभ होणार आहे, असा दावा केला जात आहे. मात्र पाषाण, औंध, बाणेर परिसरातील स्थानिक नागरिकांसह काही स्वयंसेवी संस्थांनी या बोगद्यला विरोध दर्शविला आहे. बोगद्यमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून टेकडीवरील जैवविविधतेचा ऱ्हास होईल तसेच वनाज ते रामवाडी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाची प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेमुळे बोगद्यची आवश्यकता राहणार नाही, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.