नवी दिल्ली : ‘बुल्लीबाई’ अ‍ॅपचे प्रकरण ताजे असताना आता हिंदू महिलांना कथितपणे लक्ष्य करणारे असेच वादग्रस्त चॅनेल मंगळवारी समोर आले. हे चॅनल क्रॉस-प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये हिंदू महिलांचे फोटो कथितपणे शेअर केले गेले होते. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल ट्विट्सची मालिकाच समोर आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे वादग्रस्त चॅनेल ब्लॉक केले आहे.

आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करून माहिती दिली आहे. संबंधित वादग्रस्त चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे आणि पुढील कारवाईसाठी केंद्र सरकार राज्य पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

अधिक वाचा  कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: आरोपी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द

वादग्रस्त चॅनेलवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे ट्विट एका महिलेने आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत केले होते. या महिलेच्या ट्विटला आयटी मंत्री वैष्णव यांनी उत्तर दिले. ते चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे. केंद्र सरकारकडून या कारवाईत समन्वय ठेवला जात आहे, असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. पण कुठल्या राज्याच्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ‘बुल्लीबाई’ प्रकरण हे मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिटकडे सोपवले. विदेशातील होस्टिंग प्लॅटफॉर्मवरून या अ‍ॅपबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आणि लवकरच धागेदोरे हाती येतील, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.