सोलापूर : उत्पादनात वाढ झाली तरी बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडत नाही. आतापर्यंत सर्व बाबींवर संशोधन करण्यात आले आहे. त्याचा फायदा उत्पादन वाढवण्यासाठी झाला पण आधारभूत किंमतीपासून सदैव शेतकरी हा दूरच राहिलेला आहे. आता शेतीमालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एक विशेष सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारकडून यासाठी पेटंटही प्राप्त झाले असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

नेमकं सॉफ्टवेअरमध्ये  काय?

शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून कोणत्या वेळी कोणते पीक घ्यावे, शिवाय कोणत्या शेतीमालाला कोणत्या कालावधीमध्ये अधिकचा भाव मिळणार आहे याची माहिती मिळणार आहे. तर हवामानानुसार कोणत्या विभागामध्ये कोणते पीक घ्यावे याची अचूक माहिती शेतकऱ्यांना होणार आहे. आतापर्यंत केवळ परंपरेने घेत आलेल्या पिकांनाच शेतकऱ्यांनी महत्व दिलेले आहे. पण पीक लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंतचे मार्गदर्शन हे या सॉफ्टवेअरमधून होणार आहे.

अधिक वाचा  पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार 'आप'कडून भगवंत मान केजरीवाल यांचा निर्णय

केंद्र सरकारकडून पेटंटही

सोलापूर विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या या सॉफ्टवेअरचे नाव ‘अॅन इंटिलिजेंट सिस्टिम अॅण्ड ए मेथड फॅार सिस्टिमॅटिक डिस्ट्रिब्युशन आॅफ अग्रीकल्चर गूडस्’ असे आहे. वस्तूची किमंत तसेच वितरणासंबंधी हे सॉफ्टवेअर महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कुलगुरु डॅा. मृणालिनी फडणवीस आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रकाश व्हनकडे यांनी या सॉफ्टवेअर संबंधी माहिती दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होणार असून केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून याला पेटंटही जाहीर करण्यात आले आहे.

वापरासंबंधी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

अद्याप या सॉफ्टवेअरचा वापर सुरु झालेला नाही पण विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग हा शेतीमालाच्या दरासाठी शेतकऱ्यांना आणि शासनालाही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे यासंबंधीचा एक प्रस्ताव सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे अर्थशास्त्र विभागाचे डॅा. प्रकाश व्हनकडे यांनी सांगितले आहे.