“महाविकास आघाडी आम्ही स्वीकारली. पण आमचं अस्तित्व राहू द्या, आम्हाला मारू नका. शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे.” ही भीती व्यक्त केलीय पुण्यातील शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे तीनवेळा खासदार राहिलेल्या आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी. आणि त्यांचा निशाणा होता राष्ट्रवादीवर. राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याची भीती काही फक्त आढळराव पाटलांनीच व्यक्त केलीय, अशातलाही भाग नाही. अगदी काही दिवसांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी तर पत्रकार परिषद घेऊनच आपली नाराजी व्यक्त केली होती.

त्याहीपूर्वी ठाण्यातील शिवसेना नेत प्रताप सरनाईक, नाशिकमधील आमदार सुहास कांदे किंवा ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनीही वेळोवेळी महाविकास आघाडीतील घुसमट जाहीरपणे बोलून दाखवलीय. यातील बहुतांश शिवसेना नेत्यांचा निशाणा राष्ट्रवादीवार असल्याचा दिसून आला. त्यात पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचता येत नसल्याची भावनाही अप्रत्यक्षपणे दिसते.

आणि आधार काय? महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीची थेट लढत कुठे होते, सेना नेतृत्वानं या सगळ्या धुसफुशीची दखल न घेतल्यास पुढे काय होईल, या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत. तत्पूर्वी, हे सर्व प्रश्न उद्भवण्याला कारण ठरलेल्या वक्तव्य आणि घटना कोणत्या हे थोडक्यात पाहू.

आतापर्यंत कोणत्या शिवसेना नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली?

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली नव्हती. खरंतर तेव्हापासूनच पक्षांतर्गत नाराजीस सुरुवात झाली. नंतर वेळोवेळी या नेत्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. सर्वात स्फोटक नाराजी ठरली ती प्रताप सरनाईक यांची. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं चौकशीचा ससेमिरा लागल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याचं आवाहन केलं होतं.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावतेंनीही अनेकदा आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिलीय. मराठी भाषेच्या मुद्यावर बोलताना रावते म्हणाले होते की, मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण मराठीसाठी काहीच नाही. मेल्यावर साहेबांना काय उत्तर देऊ?फडणवीस सरकारच्या काळात आरोग्यमंत्री राहिलेल्या दीपक सावंत यांनीही मुलाखती देऊन जाहीरपणे म्हटलं होतं की, “दीडवर्षांपासून काम मागतोय, पण काहीच दिलं जात नाही. पक्ष संघटनेत तरी काम द्यावं.”

माजी केंद्रीय मंत्री आणि रायगडचे माजी खासदार अनंत गीते हे सध्या फारसे सक्रीय दिसत नाहीत. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे त्यांचे कायम विरोधक राहिलेत. तटकरेंना उद्देशून रायगडमधील जाहीर सभेत बोलताना गीतेंनी म्हटलं होतं की, “राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच.” नाशिकमध्ये छगन भुजबळांसोबत नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदेंचा भर कार्यक्रमात झालेल वाद सर्वश्रुत आहे. नांदगावला मिळत असलेल्या त्रोटक निधीवरून कांदेंनी भुजबळांवर टीका केली. नंतर भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचंही कांदेंनी सांगितलं होतं.

त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन पक्षांतर्गत नाराजीला वाट मोकळी करून दिली. अनिल परबांपासून उदय सामंत यांच्यापर्यंत टीका केली. राष्ट्रवादीच्या मदतीने कोकणताली शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेतल्या नेत्यांवरच केला. आता शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचा आरोपही कदमांच्या आरोपाच्या जवळ जाणार आहे. आढळराव पाटलांनीही दिलीप वळसे पाटलांच्या निमित्तानं राष्ट्रवादीलाच निशाणा केलाय. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेनेतल्या नाराजांच्या निशाण्यावर असल्याचं दिसून येतं. त्यामुले सहाजिक राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वादाची कारणं शोधणं महत्वाचं ठरतं.

शिवसेनेला राष्ट्रवादी ‘संपवेल’ अशी भीती या नेत्यांना का आहे?

खरंतर महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काँग्रेसही आहे. मात्र, अनेक नाराज शिवसेना नेत्यांच्या बोलण्यात राष्ट्रवादीबाबत भीती दिसून येते. मग राष्ट्रवादीचीच भीती इतकी सेना नेत्यांना का आहे, याबाबत बीबीसी मराठीनं राजकीय विश्लेषकांशी चर्चा करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात की, ग्रामीण भागात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मतदार हा बऱ्यापैकी सारखा आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच संघर्ष होतो. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचा काँग्रेसशी तेवढा संघर्ष होत नाही, कारण काँग्रेसचा मतदारच पूर्णपणे वेगळा आहे.

2014 किंवा 2019 च्या निवडणुकीतला मतदानाचं स्वरूप लक्षात घेतलं, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची मतं एकमेकांमध्ये विभागली जातात. विशेषत: मराठा मतं या दोन पक्षात जास्त विभागली जातात. त्यामुळे संघर्ष होतो आणि होईलच, असंही अभय देशपांडे सांगतात.

अभय देशपांडे पुढे सांगतात की, “शिवाजीराव आढळराव पाटील असो, रामदास कदम असो किंवा नाशिकमधील सुहास कांदे असोत, या तिघांच्या संघर्षात समान धागा हाच आहे की, यांचा संघर्ष राष्ट्रवादीशी आहे.”

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

तर लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या मते, मुंबई आणि विदर्भ वगळल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे प्रभावक्षेत्र सारखेच आहेत. शिवाय, दोन्ही पक्ष प्रामुख्यानं प्रादेशिक असल्यानं त्यांचं लक्ष्यही जळपास जाणारे आहेत. त्यामुळे दोन्हींमधला संघर्ष मोठ्या प्रमाणात होतो.

ते पुढे सांगतात, शिवसेना जवळपास 30 वर्षे भाजपसोबत होती. पर्यायानं राष्ट्रवादीच्या विरोधात होती. आता महाविकास आघाडीच्या निमित्तानं एकत्र आलेत. त्यात सत्तेत आहेत. आधीच विरोधी विचारांचे, त्यात सत्तेआधारे पक्ष वाढवण्याच्या धोरणामुळे संघर्षाला बळ मिळणारच होता. पण राज्यस्तरावर जेव्हा सत्ता स्थापन करायची असते तेव्हा इतका विचार केला जात नाही.

मात्र, आगामी काळात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यास, जिथे संघर्षाची शक्यता आहे, तिथं मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय असेलच. एकूणच सूर असा दिसतोय की, काँग्रेसोबत असेल की नाही, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत आगामी बहुतेक निवडणुका लढवतील, असंही श्रीमंत माने म्हणतात.

राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही महाराष्ट्रापुरते ताकद राखून असलेले पक्ष आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्याही अनेक भागात या पक्षाची संघटनात्मक बांधणी पुरेशी नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या भागात पोहोचू पाहतेय.

वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांची सरकारं टिकतात का?

यावर बोलताना अभय देशपांडे म्हणतात की, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे स्वत:ला राष्ट्रीय म्हणत असले तरी ते पूर्णपणे प्रादेशिक पक्षच आहेत. मात्र, प्रादेशिक असूनही स्वबळावर सत्ता आणू शकतील इतके सबळ नाहीत. त्यामुळे विस्ताराची भूमिका या दोन्ही पक्षांची राहणारच आणि त्यातून येणारा संघर्ष होणारच.

“उदाहरणार्थ, पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना तेवढी नाहीय, जेवढी राष्ट्रवादी आहे, किंवा विदर्भात शिवसेना जेवढी आहे, तेवढी तिथं राष्ट्रवादी नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे जिथं ताकद नाही, तिथं विस्ताराचा प्रयत्न असणार आणि त्यातून मग अशा संघर्षाला सुरुवात होणार. म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला वाढायचं असेल तर त्यांचा संघर्ष राष्ट्रवादीच थेट होणार, हे उघड आहे,” असं अभय देशपांडे सांगतात.

नाराज नेत्यांमुळे शिवसेनेला फटका बसेल का?
रामदास कदमांपासून प्रताप सरनाईकांपर्यंत अनेक शिवसेना नेते नाराज असल्याचं दिसून आलंय. या नेत्यांनी जाहीरपणे आपली नाराजीही व्यक्त केलीय. या नाराजीचा फटका शिवसेनेला बसेल का?

तर अभय देशपांडे सांगतात, “शिवसेनेचं राजकारण हे भावनिक मुद्द्यांवर असतं. त्यामुळे नाराज नेत्यांचा त्यांना फटका बसण्याची शक्यता फारशी उरत नाही. नांदेडचं उदाहरण घेता येईल. केवळ ओवेसी प्रचाराला आलेम म्हणून तिथं शिवसेनेच्या दहा-बारा जागा निवडून आल्या होत्या.”

“शिवसेनेत नाराज नेते असले किंवा नेते सोडून गेले, तरी सेनेला फारसा फरक पडत नाही. शिवसेनेत एखाद्या नेत्यामुळे पक्षाला फायदा होत नाही, तर बऱ्याचदा पक्षामुळे नेत्याला फायदा होताना दिसतो. एकनाथ शिंदे किंवा अशी चार-पाच नेते वगळल्यास शिवसेना मागे नसेल तर जिंकण्याची ताकद राखणारे नेते कमी आहेत. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ हे नेते सोडून गेल्यानंतरही शिवसेना आपल्या जागा राखून आहे, हे याचंच उदाहरण आहे,” असंही अभय देशपांडे सांगतात.

श्रीमंत माने सांगतात की, शिवसेनेची पक्ष म्हणून प्रकृतीच अशी आहे की, पक्षप्रमुखावर सर्व अवलंबून आहे. ते सांगतील तो निर्णय अशी या पक्षाची रीत असल्यानं नाराजांना गोंजारणं कमी होतं आणि त्यांचा फटकाही फारसा पक्षाला बसताना दिसत नाही.

नाराजांमुळे शिवसेनेला जागांमध्ये काही फटका बसेल, याची शक्यता फारच कमी दिसत असल्याचं श्रीमंत माने सांगतात.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची कुठे टक्कर होते?
2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपने युती म्हणून, तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी म्हणून लढवली. मात्र, विधानसभेनंतर सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून फिस्कटलं आणि दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यानंतर महाराष्ट्रात नव्या समीकरणांची नांदी झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली.

मात्र, यामुळे तिन्ही पक्षात सख्य आहे, असं म्हणण्याचं धाडस करता येत नाही. याचं कारण विधानसभा जागांवर जरी नजर टाकली, तरी लक्षात येतं की, अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी थेट एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.

रामदास कदमांच्या दापोली मतदारसंघात हीच स्थिती आहे. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत तिथे कायमच होत असते. मग अशावेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यताच दिसून येते.

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास लक्षात येतं की, महाराष्ट्रातील 288 पैकी जवळपास 50 मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. या आकडेवारीवरूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील संघर्षाचा ‘आकडेवारीयुक्त अंदाज’ लावता येऊ शकेल.

अधिक वाचा  राष्ट्रगीत सुरू अन् विराटचे ‘लाजिरवाण’ कृत्य; ”तू पाकिस्तानात जा!” सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया

या मतदारसंघांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत टक्कर :

जळगाव ग्रामीण – ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रमुख स्पर्धक राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीच्या पुष्पा महाजन यांना पराभूत करून गुलाबराव पाटील विजयी झाले आहेत.
चोपडा – शिवसेनेच्या लताबाई सोनवणे या राष्ट्रवादीच्या जगदीशचंद्र वळवी यांना पराभूत करून विजयी झाल्यात.
एरंडोल – शिवसेनेचे चिमणराव पाटील हे राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटील यांना पराभूत करून विजयी झालेत.
पाचोरा – शिवसेनेचे किशोर पाटील हे या मतदारसंघातून आमदार आहेत. इथंही राष्ट्रवादी प्रमुख स्पर्धक आहे. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दिलीप वाघ यांना पराभूत केलं होतं.
सिंदखेडराजा – राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. डॉ. शिंगणे जिंकले असले, तरी दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडकर होते आणि दहा हजारांच्या फरकानेच ते पराभूत झाले होते.
दिग्रस – शिवसेनेचे संजय राठोड या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या ताहील लोखंडवाला यांना पराभूत करून विजयी झाले आहेत.
वसमत – या मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आमदार आहेत. मात्र, इथं प्रमुख प्रतिस्पर्धा शिवसेना आहे. 2019 साली शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी नवघरेंना टक्कर दिली होती.
कन्नड – उदयसिंग राजपूत हे शिवसेनेचे आमदार इथं आहेत. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादीचीही ताकद आहे. संतोष कोल्हे हे इथून राष्ट्रवादीचे तुल्यबळ उमेदवार होते.
घनसावंगी – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा हा मतदारसंघ. इथं टोपेंच्या रुपात राष्ट्रवादी विजयी झाली असली, तरी त्यांचा प्रमुख विरोधक शिवसेना आहे. हिकमत उढाण हे इथून सेनेचे उमेदवार होते, जे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
पैठण – सेनेचे संदीपान भुमरे हे इथून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे हे 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी राहिले होते. त्यामुळे इथं मुख्य लढत सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होते.
वैजापूर – शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणाऱ्या या मतदारसंघात सघ्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. रमेश बोरनारे हे इथून आमदार आहेत.
नांदगाव – छगन भुजबळांवर टीकेमुळे गेल्या काही दिवसात चर्चेत आलेले सुहास कांदे हे शिवसेनेचे आमदार इथून विजयी झालेत. भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा सुहास कांदे यांनी पराभव केला. त्यामुळे या मतदारसंघात सेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद होणं हे जवळपास अटळ मानलं जातं.
येवला – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे इथून आमदार आहेत. या मतदारसंघात त्यांचा प्रमुख विरोधक शिवसेना आहे. सेनेचे संभाजी पवार इथून पराभूत झाले होते.
सिन्नर – राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे हे इथून आमदार आहेत. शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांचा त्यांनी पराभव केला होता.
देवळाली – राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या योगेश घोलम यांना पराभूत करून इथे विजय मिळवला होता.
निफाड – राष्ट्रवादीचे दिलीप बनकर हे इथून विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या अनिल कदम यांना त्यांनी पराभूत केलं.
दिंडोरी – विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे या मतदारसंघातून आमदार आहेत. ते राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. त्यांच्या मतदारसंघात प्रमुख विरोधक शिवसेनेचा आहे. शिवसेनेचे भास्कर गावित हे पराभूत झाले होते.
इगतपुरी – हिरामण खोसकर हे राष्ट्रवादीचे आमदार इथून जिंकले असून, निर्मल गावित या शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांनी 2019 मध्ये पराभव केला होता.
भिवंडी ग्रामीण – शिवसेनेचे शांताराम मोरे हे इथून आमदार आहेत. दुसऱ्या स्थानावर मनसे, तर तिसऱ्या स्थानी राष्ट्रवादी आहे. मनसेमुळे तिहेरी लढत झाली. अन्यथा, राष्ट्रवादीची ताकद असलेला हा मतदारसंघ आहे.
शहापूर – राष्ट्रवादीचे दौलत दरोडा हे विद्यमान आमदार असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचीही ताकद आहे. मागच्या निवडणुकीत सेनेच्या पांडुरंग बरोरा यांचा दरोडांनी पराभव केला होता.
मुंब्रा-कळवा – राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ. या मतदारसंघात प्रमुख विरोधक शिवसेनाच आहे. आव्हाडांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा पराभव केला होता.
दिंडोशी – मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे इथून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विद्या चव्हाण उमेदवार होत्या. मात्र त्यांचा पराभव होऊन, त्या दुसऱ्या स्थानी राहिल्या. त्यामुळे इथेही सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच थेट लढत होते.
अणुशक्तीनगर – नवाब मलिक हे या मतदारसंघातून आमदार आहेत. इथे शिवसेनेची ताकद आहे. तुकाराम काटे हे सेनेचे उमेदवार जवळपास 20 हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते.
कर्जत – शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे इथून आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत थोरवेंना प्रमुख आव्हान राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांचं होतं. सुरेश लाड हे महाविकास आघाडीमुळे नाराज असल्याचंही बोललं जातंय.
श्रीवर्धन – राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा हा मतदारसंघ. त्यांची कन्या आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना 2019 साली इथून पराभूत केलं होतं.
जुन्नर – राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे इथून आमदार आहेत. शिवसेना इथं प्रमुख विरोधक आहे.
आंबेगाव – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे इथून आमदार आहेत. राजाराम बाणखेले या शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला होता.
खेड-आळंदी – दिलीप मोहिते हे राष्ट्रवादीचे आमदार इथून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सुरेश गोरे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
पिंपरी – अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार इथून आहेत. शिवसेना हा इथे मुख्य विरोधक आहे. गौतम चाबुकस्वार यांचा पराभव बनसोडेंनी केला होता.
पारनेर – राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांनी शिवसेनेच्या विजय औटी यांचा इथून 2019 साली पराभव केला होता. इथे नीलेश लंके यांचं वर्चस्व असलं तरी इथं शिवसेनेचंही वर्चस्व आहे.
अहमदनगर शहर – राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे इथून शिवसेनेच्या अनिल राठोड यांना पराभूत करून विजयी झाले होते.
बीड – संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार असून, इथे जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेचे नेते आहेत.
उस्मानाबाद – शिवसेनेचे कैलाश घाडगे पाटील हे इथून आमदार असून, त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय निंबाळकरांना पराभूत केलं होतं.
परांडा – शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव करून विधानसभेत 2019 साली धडक मारली. इथं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना पाहायला मिळवतो.
माढा – राष्ट्रवादीच्या बबनराव शिंदेंनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा या मतदारसंघातून 2019 साली पराभव केला होता.
मोहोळ – इथेही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच थेट सामना पाहायला मिळाला होता. यशवंत माने हे राष्ट्रवादीचे आमदार इथून विजयी झाले आहेत.
कोरेगाव – राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव इथं शिवसेनेचे महेश शिंदे यांनी केला होता. इथंही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत पाहायला मिळते.
कऱ्हाड उत्तर – राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील इथून विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष, तर तिसऱ्या स्थानी शिवसेना राहिली. शिवसेनेचा या मतदारसंघात प्रभाव आहे.
पाटण – राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई हे या मतदारसंघातून निवडून येतात. इथं राष्ट्रवादीचीही ताकद आहे. दुसऱ्या स्थानी राष्ट्रवादी असते.
दापोली – योगेश कदम हे शिवसेनेचे आमदार इथून आहेत. तर मुख्य विरोधक राष्ट्रवादीचे संजय कदम आहेत. योगेश हे रामदास कदम यांचे पुत्र आहेत. याच जागेवरून रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती आणि शिवसेनेतील नेत्यांवरही टीका केलीय.
रत्नागिरी – शिवसेनेचे उदयम सामंत हे या मतदारसंघून आमदार असून, राष्ट्रवादी इथं प्रमुख विरोधक आहे. राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर हे दुसऱ्या स्थानी 2019 साली राहिले होते.
चिपळूण – शेखर निकम हे राष्ट्रवादीचे आमदार इथून निवडून आले असले, तरी इथे शिवसेनेचीही ताकद आहे. सदानंद चव्हाण हे शिवसेना नेते या मतदारसंघात प्रमुख विरोधक आहेत.
गुहागर – भास्कर जाधव हे या मतादरसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. या मतदारसंघातही दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे.
सावंतवाडी – राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले दीपक केसरकर इथून आमदार आहेत. इथे दुसऱ्या स्थानी राजन तेली हे अपक्ष आहेत, तर तिसऱ्या स्थानी राष्ट्रवादी आहे.
राधानगरी – प्रकाश आबीटकर हे  आमदार या मतदारसंघातून आहेत. इथे के. पी. पाटीशिवसेनेचेल यांच्या रुपानं राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी 2019 साली राहिली होती.
कागल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या मतदारसंघात प्रमुख स्पर्धक शिवसेना आहे.
इस्लामपूर – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात शिवसेनाच आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ – राष्ट्रवादीच्या सुमन पाटील या इथल्या आमदार असून, इथेही शिवसेना मुख्य स्पर्धक आहे. सुमन पाटील या माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आहेत.