पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ वक्तव्ये करून अभिनेते अनुपम खेर अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्यांना एका टीव्ही मुलाखतीदरम्यान लोक तुम्हाला मोदी भक्त म्हणतात, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर अनुपम खेर यांनी एका गाण्याच्या माध्यमातून दिले होते. यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

टाइम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अँकरने अनुपम खेर यांना विचारले, “तुम्ही मोदी भक्त, उजव्या विचारसरणीचे आहात आणि या सरकारची भाषा बोलता, असे आरोप तुमच्यावर होतात. सोशल मीडियावर असे आरोप करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? यावर अनुपम खेर म्हणाले, आमच्या काळातील एक खूप प्रसिद्ध गाणे आहे…कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. छोड़ो बेकार की बातों को, कहीं बीत ना जाए रैना.”

अधिक वाचा  इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार- नरेंद्र मोदी

आपला मुद्दा पुढे करत अनुपम खेर म्हणाले, “नवीन वर्ष आले आहे आणि आपण त्याची सुरुवात करत आहोत. मी नुकतेच माझ्या भाचीच्या लग्नाला गेलो होतो आणि नंतर काशी विश्वनाथला एका चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलो होतो… आता मी माझ्या भावासोबत एका वेलनेस सेंटरमध्ये आहे. या गोष्टींमध्ये लोकांना काही समजत असेल तर त्यांनी ते समजावं,” असे ते म्हणाले.

“मी शिवभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत अनुपम खेर म्हणाले की, त्यांची स्तुती करणे ही भक्ती असेल तर मला काहीच हरकत नाही. मी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही मोठा चाहता आहे. तुम्ही मला त्यांचा भक्त देखील म्हणू शकता,” असं ते म्हणाले. चित्रपट अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अनुपम खेर म्हणाले की, “मी त्यांचा भक्त नाही, मी त्यांच्या अभिनयाचा चाहता आहे. नसरुद्दीन शाह त्यांच्या सुरुवातीच्या काळात माझे प्रेरणास्थान होते.”