नागपूर: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. या वसुलीप्रकरणावरून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी देशमुखांना चांगलंच टार्गेट केलं होतं. मात्र, भाजपचेच नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी थेट अनिल देशमुखांचे आभार मानले आहेत. एका रस्त्याच्या कामात अनिल देशमुख यांनी मदत केल्याची आठवण काढत नितीन गडकरी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

काटोल नगर परिषदेने रविवारी विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घघाटनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तेव्हा त्यांनी ही देशमुखांचे आभार मानले. नागपूर ते काटोलच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात वन विभागाने खोडा घातला होता. तेव्हा अनिल देशमुख साहेबांनी मदत केली म्हणून फॉरेस्टचं क्लिअरन्स मिळालं. त्यांचंही मी आभार मानतो. नाही तर क्लिअरन्स मिळतच नव्हतं. त्यामुळे येणाऱ्या काळात अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण होईल, असं सांगतानाच नागपूरमध्येही हा रस्ता चारपदरी करून एक दोन ठिकाणी उड्डाण पूलही करणार आहोत. नागपूरच्या रिंगरोडचं काम कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट करून नवी कॉन्ट्रॅक्टरने करायला घेतलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे सर्व रस्ते पूर्ण होतील, असं गडकरी म्हणाले.

अधिक वाचा  अरविंद केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना जाहीर ऑफर

खुट्या मारायचे, तकलीफ देण्याचे धंदे कशाला?

नगर परिषदा, महानगर पालिका कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करणार आहेत. त्यामुळे अजून विकासासाठी दिशा मिळणार आहे. नागपूर ते काटोल या चौपदरीकरणाच्या रस्त्याचाही शुभारंभ झाला आहे. या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी आल्या. फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं हा वाघांसाठीचा रस्ता आहे. त्यांना म्हटलं माझा जन्म तुमच्या आधीचा आहे. मी 63-64 वर्षाचा झालो. इथं कुठल्या गावात टायगर घुसला नाही. तुम्ही कुठून घुसवला. खुट्या मारायचे आणि तकलीफ देण्याचे धंदे कशाला करता? असा सवाल मी त्यांना केला, असं गडकरी यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

अधिक वाचा  सिंधुदुर्ग: नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल;हातून गेली सत्ता

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेला प्रतिमहिना 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत तपास सुरु आहे.