नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली आहे. मुंबईकरांच्या ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत नगरविकास खात्याच्या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

“अनेकांना वाटलं असेल की मी टीव्हीवर बोलत आहे म्हणजे फक्त करोनावर बोलणार आहे. तशी आवश्यकता लागली तर काही दिवसांनी बोलेल. आजच्या महत्त्वाच्या निर्यणातून मला व्यक्तीशाह अस्सल मुंबईकर, शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आनंद होत आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना आपली जी काही पाळेमुळे आहेत ती विसरून चालणार नाही. १९६६ पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना आज कित्येक वर्षे मुंबईकरांच्या आशिर्वादाने मुंबई सांभाळत आहे. शिवसेना प्रमुखांनी सुरु केलेले काम आज आम्ही पुढे नेत आहोत. मी सुद्धा नालेसफाईचे काम नाल्यामध्ये उतरून पाहिले आहे. आता माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे. मुंबईकर म्हटल्यावर फक्त त्यांनी करच भरायचे का? दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. जनतेच्या कष्टातून सगळी कामे होत असतात. आपण ते काम केले आणि त्याची मोठी जाहिरात करायची ते मला स्वतःला पटत नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  106 नगरपंचायंती Election: विजयाचा गुलाल कुणाला?; मंत्र्यांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

“ मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत. आता नवीन मित्र सोबत आले आहेत. तिघे मिळून आपण पुढे जात आहोत. इतर पक्ष आम्ही हे करु असे म्हणतात आणि कालांतराने तेही विसरतात आणि लोकसुद्धा विसरतात. खोटं बोलायचं नाही आणि जे जमणार असेल तेच वचन द्यायचे. जे जमणार नसेल ते निवडणुक जिंकण्यासाठी उपयोगी पडणार असेल तरीसुद्धा खोटं वचन द्यायचं नाही ही आपली परंपरा आहे. हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीची कर्जतवर एकहाती सत्ता; राम शिंदेंना कात्रजचा घाट

“२०१७ मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केले आहेत. पण मुंबईकरांसाठी ५०० फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. अनेक जण येतात आणि अस बोलायचच असतं असे बोलून जातात. आम्ही तोंडातून वाफा काढत नाही. जे बोलतो ते करतो. मी मुंबईकरांना वचन देतो तुमच्या आरोग्याची आणि सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.