दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील सर्वात आव्हानात्मक मानला जाणारा सेंच्युरियनचा गड भारताने गुरुवारी सर केला. भारताच्या वेगवान माऱ्याने पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी शानदार विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेतील मालिका विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.

२०२१ वर्षांला भारताने ऑस्ट्रेलियातील गॅबा येथील ऐतिहासिक विजयाने प्रारंभ केला होता. आता वर्षांची सांगता सेंच्युरियनवरील यशाने भारताने केली. १९९२मध्ये भारतीय संघ आफ्रिकेत प्रथमच दौऱ्यावर गेला होता. परंतु २९ वर्षांनंतर सेंच्युरियनवर विजय मिळवणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला आहे.

सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर ३०५ धावांचे लक्ष्य पेलण्यात आफ्रिकेचा संघ अपयशी ठरला. भारतीय गोलंदाजांनी पाचव्या दिवशी आफ्रिकेचा दुसरा डाव ६८ षटकांत फक्त १९१ धावांत गुंडाळून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सामन्याचा दुसरा दिवस पूर्णत: पावसाने वाया गेल्यावरही भारताच्या वेगवान माऱ्याने वर्चस्वपूर्ण कामगिरीसह हा सामना जिंकण्याची किमया साधली.

अननुभवी खेळाडूंचा मोठय़ा प्रमाणात भरणा असलेल्या आफ्रिकेला दोन्ही डावांत दोनशे धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. कर्णधार डीन एल्गरने १५६ चेंडूंत ७७ धावांची झुंजार खेळी साकारत पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.

अधिक वाचा  भाजपकडून पटोलेंवर गुन्हा दाखल; 'ते' वक्तव्य भोवणार?अटकेची मागणी

भारताच्या विजयात वेगवान गोलंदाजांच्या चौकडीने एकूण १८ बळी घेत सिंहाचा वाटा उचलला. उपाहारानंतर रविचंद्रन अश्विनने आफ्रिकेचे तळाचे दोन फलंदाज बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पहिल्या डावात शतकी खेळी उभारणाऱ्या उपकर्णधार केएल राहुलने भारताच्या विजयाचा पाया रचला, तर मोहम्मद शमी (५/४४ व ३/६३) आणि जसप्रीत बुमरा यांनी कळस चढवला. मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी उत्तम साथ देत आपली भूमिका चोख बजावली.

बुमराने (३/५०) अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात एल्गरला बाद करून भारताच्या विजयामधील महत्त्वाचा अडथळा दूर केला. दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आला होता. तेंबा बव्हुमाने नाबाद ३५ धावा करीत अखेपर्यंत किल्ला लढवला. अनुभवी िक्वटन डीकॉकने (२१) काही आकर्षक फटके खेळत आशा जागवल्या. पण सिराजने त्याचा त्रिफळा उडवला. अश्विनने लुंगी एन्गिडीला चेतेश्वर पुजाराद्वारे झेलबाद करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अधिक वाचा  उत्पल पर्रीकर अपक्ष लढण्यावर संजय राऊत म्हणाले – पणजीतील लढाई आता.....

२०२१ वर्षांची भारतीय क्रिकेट इतिहासात नोंद -राहुल

भारतीय संघाला २०२१ वर्षांत ऑस्ट्रेलियाला गॅबा आणि दक्षिण आफ्रिकेला सेंच्युरियनमध्ये कसोटीत पराभूत करण्यात यश आले. त्यामुळे या वर्षांची भारतीय क्रिकेट इतिहासात नोंद होईल, असे मत भारताचा सलामीवीर के. एल. राहुलने व्यक्त केले. ‘‘हे वर्ष भारतीय संघासाठी खास ठरले. आम्ही अविश्वसनीय यश संपादन केले. मागील काही वर्षांत घेतलेल्या मेहनतीमुळे आणि शिस्तबद्ध खेळामुळे हे यश शक्य झाले,’’ असेही राहुल म्हणाला.

यशाचे श्रेय वेगवान गोलंदाजांना -कोहली

भारतीय संघाने मागील काही वर्षांमध्ये परदेशात सातत्याने कसोटी सामने जिंकले आहेत. कर्णधार विराट कोहलीने भारताच्या या यशाचे श्रेय वेगवान गोलंदाजांना दिले. ‘‘आमचे वेगवान गोलंदाज ज्याप्रकारे प्रभावी मारा करतात, त्यामुळेच आम्हाला विजय मिळवणे शक्य होते. केवळ या कसोटीत नाही, तर मागील दोन-तीन वर्षांत वेगवान गोलंदाजांनी आम्हाला कठीण परिस्थितीतूनही सकारात्मक निकाल मिळवून दिले आहेत,’’ असे कोहलीने सांगितले. तसेच राहुल आणि मयांक अगरवाल या सलामीवीरांनी पहिल्या डावात केलेली ११७ धावांची भागीदारी भारतासाठी महत्त्वाची ठरल्याचे कोहलीने नमूद केले.

अधिक वाचा  कर्वेनगर DP रस्ता मधोमध रेडिमिक्स प्लान्ट; अपघाताचे प्रमाण वाढले

 भारताने २०२१ या वर्षांत १४ कसोटी सामन्यांपैकी आठ विजय मिळवले. हे सामने चार देशांमध्ये जिंकले आहेत. याशिवाय तीन सामने अनिर्णित राखले, तर तीन सामने गमावले.

४ भारताने २०२१ या वर्षांत परदेशातील आठ सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय मिळवले. याशिवाय दोन सामने अनिर्णित राखले, तर दोन सामन्यांत पराभव पत्करला.

४ भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर हा चौथा सामना जिंकला.

१०० बुमराने भारताकडून परदेशात वेगवान १०० बळींचा टप्पा गाठण्याची किमया साधली.

१० भारताच्या वेगवान गोलंदाजांनी १०व्यांदा १८ किंवा त्याहून अधिक बळी मिळवले. जानेवारी २०१८नंतर सातव्यांदा भारताला हे यश मिळवता आले आहे.