राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावरील हल्लाप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘जोपर्यंत पोलिसांकडील चौकशी पूर्ण होत नाही. आरोपी कोण हे निष्पन्न होत नाही, तोपर्यंत एकनाथ खडसे आणि त्यांच्या परिवाराने शिवसेनेला बदनाम करू नका असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. मात्र  पोलिसांकडून चौकशी झाल्याशिवाय आरोप करणे चुकीचे आहे. आमदारांनीच विधानसभेत याप्रकरणाची आयपीएस अधिकार्‍याकडून नि:पक्षपातीपणे चौकशीची मागणी केली आहे. चौकशी झाल्यानंतर दोषी आमच्या पक्षाचा असला तरी हयगय करणार नाही. मात्र चौकशीअंती सत्य बाहेर आल्याशिवाय खडसे यांनी शिवसेनेला बदनाम करु नये असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

अधिक वाचा  पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल

आमदार चंद्रकांत पाटील हे सेनेचे नाहीत, यावर बोलतांना मंत्री पाटील म्हणाले आमदार कोणत्या पक्षाचे त्याचे सर्टीफिकेट एकनाथ खडसेंनी देवू नये. तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. कोण कोणत्या पक्षात होतं आणि पक्ष सोडून आता कोणत्या पक्षात आहे. हे सार्‍या जगाला माहिती आहे. असा टोला पाटील यांनी खडसे यांना लगावला.