पुणे : सध्याचे राज्यातील सरकार हे भाजपच्या कृपेनेच आले आहे. भाजप नेतृत्व आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या. त्या पाळल्या गेल्या नाहीत. हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही वेगळी भूमिका घेतली. ठाकरेंची ती भूमिका राजकीयदृष्ट्या आमच्यासाठी सुसंगत असेल तर आम्ही स्वस्थ कशासाठी बसायचे. त्यानंतर आम्ही फोन करून त्यांना सांगितलं की तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात. तुम्हाला ठावूक आहे की, बाळासाहेब माझे मित्र होते. त्यामुळे मित्राच्या मुलाच्या पाठीशी मी आहे, बाकीचं तुम्ही ठरवा, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यात पवारांचे सरकार आहे का प्रश्नावर गुगली टाकली.

अधिक वाचा  नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा : किसान मोर्चाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार हे एका मुलाखतीदरम्यान बोलत होते. त्यावेळी त्यांना ‘महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी जरी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यावेळीही म्हटलं जायचं की ते पवारांचं सरकार आहे. ते गुपीत त्यावेळी कळलं नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे ते उघड झाले आहे, असे म्हणता येईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी वरील उत्तर दिले.

मनोहर जोशी १९९५ मध्ये मुख्यमंत्री झाले तरी सरकार मात्र पवारांचे आहे, यामध्ये काही खरं नाही. ही गोष्ट खरी आहे की मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आयुष्यात पहिल्यांदाच प्रशासनाच्या कामात होते. बाळासाहेब ठाकरेंचं एक वैशिष्ट्य होते की आमचं मतभेद होते. त्यांनी माझ्यावर जेवढी टीका केली असेल तेवढी टीका दुसरी कोणी केली नसेल. बाळासाहेबांसाठीही च्वाईसेस वर्ल्ड माझ्याकडूनच वापरले गेले आहेत. हे सर्व असले तरी बाळासाहेब हे दिलदार मनाचे मित्र होते. अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सरकार आले असेल आणि त्यांनी काही प्रश्नाच्या संदर्भात माहिती किंवा सल्ला विचारला तर राज्याचा विचार करून त्यांच्या प्रश्नाला रास्त उत्तर द्यावं, ही काळजी मी त्यावेळी घेतली होती. त्यामुळे त्यावेळीही एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेत असू, अशी आठवण शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

अधिक वाचा  सोयगाव नगरपंचायत: रावसाहेब दानवेंना 'जोर का झटका', शिवसेना 17 पैकी तब्बल 9 विजयी

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसंदर्भातही घडलेला किस्सा पवार यांनी मुलाखतीत सांगितला. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मंगळवारी (ता. २८ डिसेंबर) काही मतभेद झाले. त्यानंतर ते मार्गस्थ लागलं आणि स्पीकरचं इलेक्शन टळलं. पण, सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली की शरद पवारांनी सल्ला दिला आणि त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये बदल झाला. ही गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझं थोडं बोलणं झालं होतं. पण असं करा किंवा तसं करा, असं मी यत्किंचीतही सांगितलं नव्हतं. पण सगळ्या वर्तमानपत्रांनी या सर्व प्रकरणाच्या मागे माझा काहीतरी हात आहे, अशी भूमिका मांडली आहे. ही नेहमीची गोष्ट आहे, त्यात नवीन काही नाही.