आरोग्य भरतीच्या गट ‘ड’च्या पेपरफुटीमध्ये सहभागी आरोपींच्या तपासातून गट ‘क’चाही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. मुंबईतील आरोग्य विभागाच्या कार्यालयाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यासह परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या ‘न्यासा’ कंपनीचा पेपरफुटीमध्ये हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पेपर छापला त्या ठिकाणाहूनच एजंटना पेपर पाठविला गेल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी पुणे पोलिसांनी निशीद रामहरी गायकवाड आणि राहुल घनराज लिंघोट या एजंटांना अटक केली गेली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातही प्रशांत बडगिरे, डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांचा समावेश असल्याचे आढळल्यानंतर त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आरोपींना १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

अधिक वाचा  ‘आयपीएल’ प्रायोजकत्व : नेमका किती पैशाचा खेळ? 'DFL‘ ते TATA स्थित्यंतराचा हा वेध

आरोग्य विभागाच्या भरतीसाठी गट ‘ड’चा पेपर ३१ ऑक्टोबरला तर, गट ‘क’चा पेपर २४ ऑक्टोबरला झाला होता. गट ‘ड’चा पेपर फोडल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात डॉ. बोटले, बडगिरे, डॉ. संदीप जोगदंड यांच्यासह १८ जणांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून लॅपटॉप व मोबाइल जप्त करण्यात आले होते. या सर्व गोष्टींचा तपास केल्यानंतर पोलिसांना गट ‘क’चा पेपर फोडल्याचे आढळून आले. या गुन्ह्यात आता अटक केलेले आरोपी गायकवाड व लिंघोट यांनी आरोग्य ‌विभाग गट ‘क’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडून दलालांमार्फत पैसे घेतल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. बोटले यांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये परीक्षा घेणाऱ्या ‘न्यासा’चाही सहभाग असल्याचे आढळून आले. या प्रकरणात न्यासा कंपनीच्या संचालकांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

अधिक वाचा  जेष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील प्रकृती गंभीर; शुद्ध चार दिवसांपासून हरपली

पाचशे जणांना पेपरवाटप

पेपर तयार करणाऱ्या समितीत डॉ. महेश बोटले यांचा समावेश होता. पेपर छपाईच्या ठिकाणावरून परीक्षेपूर्वीच त्यांनी विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले आणि त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यासाठी काही क्लासचालकांना हाताशी धरल्याची बाब तपासात समोर आली आहे. आत्तापर्यंत त्यांनी ४०० ते ५०० विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच पेपर पोहोचविल्याचे समोर आले आहे. पेपर पुरविल्यानंतर आरोपींनी उमेदवारांकडून आठ ते दहा लाख रुपये घेतल्याचे तपासात आढळून आल्याचे गुप्ता यांनी नमूद केले.