राधानगरी धरणाच्या इमर्जन्सी (रिडले) गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा गेट जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू झाला असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर शहरातही पाणी शिरण्याची शक्यता असल्यानं प्रशासन सावध झालं आहे.

राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम सुरू असताना अचानक दरवाजा उघडला गेला. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्यानं दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील लोकांनी नदीवर जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अधिक वाचा  मकर संक्रांत आणि तीळ गुळ यांचे महत्व

जुलै महिन्यात कोल्हापुरात महापूर आला होता. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त न झाल्यास महापूराची तर शक्यता आहेच, शिवाय धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने नंतर शेती आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.