पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. नवीन वर्षाच्या स्वागतालाच जिल्ह्यात पहिली बैलगाडा शर्यती भरणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 1 जानेवारी 2022 पहिल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.

इथे होणार आहे शर्यत

राज्यात पहिली बैलगाडा शर्यत पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे नव्या वर्षाच्या सुरुवातीला भरणार आहे, 1 जानेवारी 2022 रोजी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावात ही शर्यत होणार असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करत जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने हि शर्यत आयोजित केली जाणार असल्याने नव्या वर्षात लांडेवाडीत भिर्रर्रर्रर्र चा नाद घुमणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये एक उत्साह आहे. जिल्हाधिकारी पशुसंवर्धन अधिकारी पोलिस खाते यांच्या अधिकृत परवानग्या घेऊन हि शर्यत होणार असून सर्व बैलगाडा मालकांनी नियम पालन करत शर्यतीचा आनंद लुटण्याचे आवाहन या वेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालकांना केले आहे..

अधिक वाचा  कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार (DCGI)ची परवानगी

कोरोनाच्या नियमांचे होणार पालन

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळवण्यासाठी लांडेवाडीतील सरपंच व बैलगाडा मालक ग्रामस्थांची एकी कामी आली. सर्वांनी नेटाने जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची तात्काळ पूर्तता केली. त्यामुळेच अतिशय क्लिष्ट समजली जाणारी बैलगाडा शर्यतीची परवानगी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या गावाला सर्वात आधी मिळाली.

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली असली तरी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. बैलगाडा शर्यत खंड न पडू देता सुरु राहाव्यात यासाठी बैलगाडा मालकांनी शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.