जळगाव : मुक्ताईनगर जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला केल्याचं समजतंय. हा हल्ला केल्यानंतर या हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. राष्ट्रवादी शिवसेना वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातील वाद काय?

शिवसेना आमदार चंद्रकात पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप रोहणी खडसेंनी केला. महिलांची छेड काढणाऱ्या आणि त्यांची अडवणूक करणाऱ्यांना चोपच नाही, तर त्यांचे हात तोडून टाकू, असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावरुन हा सर्व वाद टोकाला पोहचला. याच वादातून रोहिणी खडसेंच्या गाडीवर हा भ्याड हल्ला केल्याचं म्हंटलं जात आहे.

अधिक वाचा  सलमान खान यांच्या महत्वाच्या केस लढणारे वकील श्रीकांत शिवडे यांचं निधन

वादाला असं फुटलं तोंड

जिल्ह्यात 21 डिसेंबरला बोदवड नगर पंचायतीसाठीच्या निवडणुकीची मतदानप्रक्रिया पार पडली. या दिवशी राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. या दरम्यान सेनेचे कार्यकर्ते हे माझ्या अंगावर धावून आले असा आरोप रोहिणी खडसेंनी केला. या सर्व प्रकाराची तक्रार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर शिवसेनेने राष्ट्रवादी आपल्यावर खोटे आरोप करतेय, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

दोन्ही पक्षांकडून जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली. यानंतर वादाला तोंड फुटलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या स्टेटसवरुन. यामुळे आता वाद आणखी चिघळला. यावरुन राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांशी सेनेचे पदाधिकारी हे असभ्यपणे वागून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. यावरुन राष्ट्रवादीने 24 डिसेंबरला स्थानिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला.