दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपाने शनिवारी विशेष देणगी मोहीम सुरू केली. पक्ष कार्यकर्त्यांसह इतरांकडून कमी रकमेच्या देणग्यांच्या माध्यमातून निधी संकलन करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ हजार रुपयांची देणगी देऊन इतरांनाही योगदान देण्याचे आवाहन केलं. दरम्यान पंतप्रधान मोदींकडूनच पक्षाला देणगी देण्याचं आवाहन करण्यात आल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली असून टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“या देशातील श्रमिक, शेतकरी, उद्योजक यांच्यामुळे हा देश बलाढ्य झाला आहे. पण आता आम्हाला भाजपाला देणगी दिल्याने देश बलाढ्य होईल हे नव्याने कळालं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जी गोष्ट सांगितली आहे त्यावरुन लोकांच्या मनात संभ्रम आहे. राजकीय पक्ष देणगी गोळा करु शकतो, पण पंतप्रधान देणगी देण्यासाठी आवाहन करत असतील तर तर मग हा नैतिकतेचा भंग आहे. भाजपाध्यक्ष नड्डा किंवा महासचिव असं आवाहन करु शकतात. पण पंतप्रधानं, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांनी माझ्या पक्षाला देणगी देण्यासाठी आवाहन करणं योग्य नाही. संपूर्ण जगात असं कोणी सांगत नाही, पण आपले पंतप्रधान करत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यात 10 हजारांहून अधिक रुग्ण; सलग ३ दिवस Corona चा विस्फोट?

“देणग्या आम्हालाच द्या दुसऱ्याला देऊ नका हा स्पष्ट संदेश आहे. देशातील जनतेकडून घेणं हा बहाणा असून हा उद्योगपतींना दिलेला संदेश दिसत आहे. भाजपाचं बँक खातं पाहिलं तर त्यात शेकडो कोटी जमा झाले आहेत. टाटांपासून सर्वांनीच त्यांनी देणगी दिली आहे. त्यात हरकत घेण्यासारखं काही नाही. देणगी देण्यात काही चुकीचं नाही, पण पंतप्रधानांनी अशाप्रकारे समोरुन देणगी देण्यास सांगण्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधानांनी फक्त राष्ट्राविषयी बोललं पाहिजे पण ते दुर्दैवाने बोलत नाहीत अशी टीकाही यावेली संजय राऊतांनी केली.

अधिक वाचा  गर्भवतींनी कोरोना लस कधी घ्यावी? 'कोव्हॅक्सिन' सुरक्षित, तज्ज्ञांचा दावा

राज्यातील भाजपा नेत्यांवर हल्लाबोल

“महाराष्ट्राच्या बाबतीच काही चांगलं, सकारात्मक, शाबासकी देणारं घडलं तर राज्यातील विरोधी पक्ष नाराज होतो. हा एक आजार असतो त्यावर कसे उपचार करायचे ते आम्ही पाहू,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“राज्यपालांनी इतका अभ्यास करणं बरं नाही”

विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन राज्यपालांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, “राज्यपाल आपले फार अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही. हे अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. एकतर मुळात लॉकडाउनमध्ये अभ्यास कमी झाला आहे, त्यात तुम्ही असा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करु लागलात. घटनेत काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या असून त्यानुसार तुम्हााल काम करायचं आहे. घटनेत मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी मान्य कराव्यात असं लिहिलं असून हे बंधनकारक आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीचं अद्याप काही झालेलं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

अधिक वाचा  वॉर्ड पुर्नरचनेचा अहवाल आज आयोगाकडे सादर होण्याची शक्यता

“राज्यपालांचं ‘शांतता अभ्यास सुरु आहे’ असं नवं नाट्य राज्यभवनात सुरु आहे. त्यात भाजपाचे प्रमुख लोकंही सहभागी आहेत. थोडं दिवस हे नाट्य सुरु राहील. अशाप्रकारची पथनाट्य सुरु असतात,” असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर प्रतिक्रिया

नितेश राणेंना अटक करण्यासंबंधी होणाऱ्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, “मला याविषटी माहिती नाही, ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणं बरोबर नाही. तेथील दोन पालकमंत्री आहेत ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर कायद्याने कारवाई होते. पण माझ्याकडे जास्त माहिती नसल्याने त्याविषयी बोलणं योग्य नाही”.