नवी दिल्ली : विशेष पोक्सो (Protection of Children from Sexual Offences – POCSO) कोर्टाने एका खटल्याच्या निकालामध्ये एक महत्त्वाचं विधान केलंय. कोर्टाने म्हटलंय की, एखाद्याला विरुद्ध लिंगी मित्र अथवा मैत्रिण आहे, याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या लैंगिक इच्छा आणि वासना पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे, असा होत नाही.

या विशेष कोर्टाने एका 20 वर्षांच्या तरुणाला त्याच्या 13 वर्षांच्या मैत्रीणीवर आणि दूरच्या नातेवाईकावर बलात्कार केल्याबद्दल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यामुळे या आरोपीने त्या मुलीचं तर आयुष्य उद्ध्वस्त केलंयच शिवाय या गुन्ह्यामुळे इतक्या कमी वयात आरोपीने स्वत:चं देखील आयुष्य उद्ध्वस्त केलंय.

अधिक वाचा  वडिलांच्या संपत्तीत मुलींचाही हक्क सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, स्पेशल जज प्रिती कुमार घुले यांनी म्हटलंय की, या आरोपीला दिलेल्या या शिक्षेने आरोपीच्या वयोगटातील आजच्या तरुणांना असा संदेश देता येईल की, वासनेच्या तृप्तीसाठीची अशी अनियंत्रित इच्छा त्यांचे स्वत:चे भविष्य, करिअर आणि प्रगतीचा महत्त्वाचा असा काळ उद्ध्वस्त करु शकते.”

कोर्टाने पुढे म्हटलंय की, तरुणांच्या भविष्यातील प्रगतीचा पाया हा त्यांच्या तरुणावस्थेच्या सुरुवातीच्याच दिवसांमध्येच आहे. सध्याच्या या प्रकरणात आरोपीने केलेल्या गुन्ह्यामुळे स्वत: आरोपीचे तसेच या गुन्ह्यातून वाचलेल्या व्यक्तीचेही भविष्य अंधाराच्या छायेत आलं आहे, असं न्यायाधीशांनी म्हटलंय.

आरोपीला त्याच्या या कृत्याचा काय परिणाम झाला आहे, ते समजलं आहे, असं नमूद करून कोर्टाने म्हटलंय की, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची गरज नाहीये. पुढे म्हटलंय की, या गुन्ह्यातील अल्पवयीन वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांअंतर्गत नुकसानभरपाई मिळू शकते. आणि पुढे कोर्टाने नमूद केलंय की, दोषीच्या या कृत्यामुळे त्या अल्पवयीन मुलीच्या लग्नात अडथळे येण्याची शक्यता आहे, कारण तिची प्रतिबद्धता आधीच तुटलेली आहे.