पुण्यातील तळेगावमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याचं प्रकार घडलाय. या मुलाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय. या घटनेमुळे तळेगावमध्ये एकच खळबळ उडाली असून अज्ञात आरोपीचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत. ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडली आहे. दशांत अनिल परदेशी असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे. दशांतची हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दशांतचे वडील अनिल परदेशी यांनी याबाबत तळेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा दशांत हा दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरीच आला नाही. त्यामुळं त्याचा शोध घरातील व्यक्ती आणि नातेवाईक घेत होते. दशांत शोध घेत असताना नॅशनल हेवी कंपनी येथे त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचं दिसून आलं. हा हत्येचा प्रकार असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या काही मीटर अंतरावर घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अधिक वाचा  ‘पुष्पा’ सिनेमातल्या शेषाचलम जंगलाबद्दल थक्क करणाऱ्या गोष्टी…

दशांतची हत्या कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. दशांतची हत्या करणाऱ्यांचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत. दशांतच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडण्यात आल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होत असल्याने त्याची हत्या कोणी केला यासंदर्भातील गूढ वाढलंय. तरुणाच्या डोक्याच्या डाव्या बाजूने गोळी झाडण्यात आली असून ती डोक्याच्या आरपार गेलीय. गोळी अगदी जवळून झाल्याने हत्या करणारी व्यक्ती या तरुणाच्या ओळखीची असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

घटनास्थळी पिस्तुल सापडलेलं नाही. तसेच दशांतचा मोबाईलही सापडलेला नसल्याने पोलीस आता या प्रकरणाचा तपास करताना या सर्व गोष्टींची चाचपणी करत सर्व शक्यता पडताळून पाहत आरोपींचा शोध घेत आहेत.