“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाविकास आघाडीने एकत्र लढून भाजपचा पराभव करून दाखवावा” असं खुलं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. रविवारी (19 डिसेंबर) पुण्यात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले, “ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. ते म्हणाले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेनच. पण शिवसेनेसाठी सत्ता हाच त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आता मुख्यमंत्री बनले आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला हरवून दाखवावं. भाजपचा कार्यकर्ता लढण्यास तयार आहे.” महाराष्ट्राची जनता हिशोब करायला तयार आहे असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर अभिनेत्याचे वक्तव्य; ‘घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही ....

आपल्या भाषणात अमित शाह यांनी 2019 निवडणुकांपूर्वी झालेल्या बैठकांबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी युतीची चर्चा करण्यासाठी आलो होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. ते म्हणतात मी खोटं बोललो. ठीक आहे. पण तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला. त्यासाठी तुम्ही हिंदुत्व सोडलं.”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “सत्तेच्या गुर्मीत असलेले लोक अशा प्रकारची वक्तव्य करतात. केंद्र सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे. त्यामुळे त्यांनीच आधी राजीनामा द्यावा.”

अधिक वाचा  17 जानेवारीला नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार

लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं असून लोकशाहीचा सन्मान करायला शिका असंही ते म्हणाले.