पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Election) अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) उमेदवार प्रवीण शिंदे शुक्रवारी (ता.१७) बिनविरोध झाले आहेत. यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलचे सात जण बिनविरोध झाले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून शुक्रवारी आठ जणांनी माघार घेतली. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग मतदारसंघातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. या मतदारसंघातून शिंदे यांच्यासह एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापैकी मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथील बाळू भांडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत अवैध ठरविला होता. त्यामुळे भांडे यांनी या निर्णयाला विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) संगीता डोंगरे यांच्याकडे अपील केले होते. डोंगरे यांनी भांडे यांचे अपील फेटाळून लावत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज अवैध ठरविण्याबाबत दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे यांच्यासह चार जण निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले होते.

अधिक वाचा  लैंगिक संबधांमुळे आरोग्य सुधारतं का? 10 सोप्या मुद्द्यात जाणून घ्या

दरम्यान, चारपैकी तुळशीराम भोईर, सुरेश जाधव आणि चंद्रजित वाघमारे यांनी शुक्रवारी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रवीण शिंदे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने ते बिनविरोध झाले आहेत. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा येत्या ४ जानेवारीला होणार आहे. दिवसभरात माघार घेणाऱ्या आठ जणांमध्ये अनुसूचित जाती, जमाती संवर्ग मतदारसंघातील तिघांसह विलास तावरे (ड वर्ग मतदारसंघ), संग्राम मोकाशी (क वर्ग व विमुक्त जाती, जमाती प्रवर्ग मतदारसंघ प्रत्येकी एक), जयश्री खेडेकर (महिला राखीव), भाऊसाहेब सपकळ (अ वर्ग इंदापूर मतदारसंघ) आदींचा समावेश आहे.