बंगळूर  येथे शिवाजीराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रात  तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रमींनी केली आहे. दरम्यान राज्यभरातून नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर बेळगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत जमलेल्या शिवप्रेमींनी प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे  यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
ते म्हणतात, ”संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अधिक वाचा  गडकोट किल्ल्यांची नावे मंत्र्यांच्या बंगल्याला गैर नाही; मात्र संभाजी छत्रपती यांची निर्णयकी भूमिका

तर या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. ”दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते.. हे चित्र बेंगळुरू येथील आहे.. धिक्कार!धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!!” असे ट्विट त्यांनी केले आहे.

या घटनेनंतर याचे पडसाद कोल्हापुरात उमटले. कोल्हापुरात हर्षल सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तांनी रात्री शहरातील कर्नाटकी मालकांची हॉटेल बंद पाडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत कर्नाटकमधील भाजप सरकारचा निषेध केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घातला.