बेळगाव : कर्नाटकातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना  केल्याचा प्रकार समोर आल्याने शिवप्रेमी चांगलेच संतापले आहेत. आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी आणि शिवसैनिकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर बेळगावातही याचे पडसाद उमटत आहेत.

बेळगावात जमावबंदीचे आदेश
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या वृत्ताने शिवप्रेमी चांगलेच संतापले आणि आक्रमक झाले. या घटनेनंतर संतापलेल्या शिवप्रेमींनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात एकत्र येत आंदोलन केलं. तसेच काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. रात्रीच्या सुमारास शिवप्रेमी चौकात एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी दगडफेकीची सुद्धा घटना घडली. शिवप्रेमी आंदोलन करत असातना कन्नड समर्थकही रस्त्यावर उतरले. या प्रकरणी बेळगावात एकूण 27 जणांना अटक करण्यात आली आहे. तर परिस्थिती पाहता बेळगावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  फाळणीनं 74 वर्षांपूर्वी विभक्त भावांची गळाभेट... ये दीवार तुटती क्यूं नहीं; नियतीनं पुन्हा जोडलं!

महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
कर्नाटकच्या बंगळुरू येथे घडलेल्या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कोल्हापूर येथे संताप व्यक्त केला. तसेच कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. कर्नाटका काही संघटना आणि समाजकंटक हे जाणून बुजून करत असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून येत आहेत. कोल्हापुरातील कर्नाटक व्यावसायिकांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ दुकाने बंद करुन या घटनेचा निषेधही केला.

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलीस फौजफाटा तैनात
कर्नाटकच्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यानंतर संतप्त पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.मिरज शहरांमध्ये शिवसैनिकांच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्यात आले. मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.तर कर्नाटकच्या कागवाड येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत शिवसेनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.