ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदाही पुनर्विचार करण्याचे सुचवले नाही. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी संघ जाहीर करण्याच्या ९० मिनिटांपूर्वी एकदिवसीय प्रकारातील कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्याचा गौप्यस्फोट विराट कोहलीने केला. त्यामुळे ‘बीसीसीआय’ आणि भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार कोहली यांच्यात सुसंवाद नसल्याचे स्पष्ट झाले.

रोहित शर्मा कर्णधार झाल्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेत असल्याच्या केवळ अफवाच असल्याचे कोहलीने नमूद केले. ‘‘रोहितसोबत माझे नाते चांगले आहे, हे मी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ठणकावून सांगत आहे. परंतु तरीही माझ्या कृत्याचा नेहमी त्याच्याशी संबंध जोडला जातो. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी खेळणार आहे. त्यामुळे मी विश्रांती घेण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका,’’ असे कोहलीने अखेरीस स्पष्ट केले.

अधिक वाचा  ड्रायव्हरला फीट; रणरागिणीने सांभाळलं स्टेअरिंग, सर्वत्र धाडसाचं कौतुक

कोहली म्हणतो…

आफ्रिका दौऱ्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी ९० मिनिटे शिल्लक असतानाच मला कर्णधारपदावरून वगळण्यात आल्याचे समजले. ‘बीसीसीआय’ने एकदाही याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. कसोटी संघाबाबत संवाद झाल्यावर बैठक संपण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना निवड समितीच्या अध्यक्षांनी मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.