वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालक आणि वाहनमालकांना आता जुन्या दंडाऐवजी नवीन दंड भरावा लागणार आहे. ११ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुधारीत मोटार वाहन कायदा २०१९ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या नियमानुसार दंडामध्ये वाढ करण्यात आली आहे. काही नियमांमध्ये थेट दहापट रक्कम दंड म्हणून वाढवण्यात आली आहे. पूर्वी वाहतूक नियम तोडल्यास दोनशे रुपये दंड भरून चालक मोकळे होत होते. मात्र आता त्यासाठी थेट न्यायालय गाठावे लागणार आहे. त्यामुळे नवीन मोटार वाहन नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस वाहतूक विभागाने केले आहे.

नवीन मोटर वाहन कायदा लागू होताच यामधील वाढीव रकमेनुसार दंड आकारणीला जिल्हा वाहतूक व शहर पोलिसांकडून सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात, वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आदी कारणांमुळे मोटर वाहन अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. विना लायसन्स वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, रॉंगसाईड वाहन चालविणे, ट्रिपल शीट, इन्शुरन्स विना वाहन चालविणे इत्यादी वाहन नियमांचे नेहमीच उल्‍लंघन केले जात होते. नवीन वाहतूक कायद्यानुसार यासाठी दंडाची रक्कम नव्याने ठरवली जात आहे. तसेच ई चालान प्रणालीत सुधारित दंडाच्या रकमेनुसार दंड आकारण्यात येणार आहे. नवीन सुधारणेनुसार काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये थेट दहा पटीपर्यंत दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. त्याच बरोबर काही प्रकरणांमध्ये दुसऱ्यांदा तशीच चूक वाहनचालकांनी केल्यास दंडासोबतच फौजदारी कारवाईला सुद्धा सामोरे जावे लागणार आहे.

अधिक वाचा  महायुतीचे एकमत हा फॉर्म्युला? भाजप सर्वाधिक जागी मित्रपक्ष भाजप कोट्यातून राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला…

नियमाबद्दल जनजागृती

नागरिकांनमध्ये नवीन वाहतूक नियमाबद्दल जनजागृती व्हावी; याकरिता पोलीस वाहतुक विभागामार्फत फ्लेक्स, ऑडिओ क्लिपसह फिरणारे वाहन चौकाचौकात उभे राहून जनजागृती करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नवीन नियमावलीच्या दंडाला घाबरून न जाता वाहतुकीचे वाहन चालविण्याचे नियम पाळावे असे आवाहन पोलीस वाहतूक विभागाने केले आहे.