मुंबई : ऑक्टोबर महिन्यात मान्सूनचा पाऊस परतल्यानंतर देखील नोव्हेंबर महिन्यात देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं तडाखा दिला आहे. त्यानंतर आता गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात मिश्र हवामान पाहायला मिळत आहे. दररोज राज्यातील किमान तापमानात चढ उतार जाणवत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात नीचांकी तापमान नोंदल्यानंतर, पुण्यातील किमान तापमानात आज किचिंतशी वाढ झाली आहे. तर मुंबईतून थंडी गायब झाली आहे. यामागील कारणाचा खुलासा हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात थंडीची लाट येण्यासाठी उत्तरेकडील हिमालयातील वाऱ्यांची आवश्यकता असते. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी जावणवते. पण सध्या राज्यात पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबईत किमान तापमानात किचिंत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानाचा पारा चढाच आहे. त्यामुळे मुंबईकरांना अद्याप थंडीची प्रतीक्षा आहे. काल मुंबईतील कुलाबा याठिकाणी 32.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सांताक्रुझ याठिकाणी 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं आहे.

अधिक वाचा  'जय भीम' ठरला ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

पुण्यातील तापमानात किचिंत वाढ

काल पुण्यातील शिरूर या ठिकाणी सर्वात कमी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान म्हणून याची नोंद करण्यात आली होती. पण आज पुण्यात पुन्हा किमान तापमानात किचिंत वाढ झाली आहे. आज पुण्यातील शिरूर येथील तापमानात 1 अंश सेल्सिअसची वाढ होऊन पारा 13.4 अंश सेल्सिअसवर गेला आहे. पुण्यातील अन्य ठिकाणी देखील 0.5 ते 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे.

हवामान खात्याने पुढील पाच दिवसासाठी महाराष्ट्रात कोणताही इशारा दिला नाही. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान वगळता राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रासह देशात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.