कोथरूड बावधन प्रभागात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आशिष गार्डन चौक ते गुरुगणेश नगर येथील डी पी रस्ता त्या ठिकाणावरील अतिक्रमणे काढून व उर्वरित रहिवासियांचे पुनर्वसन करून नव्याने तयार करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आशिष गार्डन चौक ते गुरु गणेशनगर हा रिकामा करण्यात आलेला रस्ता वाहतुकीस वापरणे गरजेचे आहे.

या ठिकाणावरील रस्ता दुभाजकाचे काम देखील पूर्ण झाले आहे. परंतु सदर रस्त्यावर अनधिकृत पणे छोटी मोठी वाहने मोठ्या प्रमाणावर लावली जात असल्याने अजूनही हा रस्ता वाहतुकीस वापरता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहतुक कोंडी होऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. व त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून रस्त्याला आवश्यक असलेले पदपथ, दुभाजक ही सर्व कामे पूर्ण केली असली तरीही वाहतूक विभागाच्या वतीने या भागातील वाहतूक नियंत्रक दिवा स्थलांतरित करून या भागातील वाहतूक पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे अशीही मागणी निवेदनात केली आहे.

अधिक वाचा  पॅरासिटामॉल वापरताय, थोडा जपून पहा डॉक्टर काय म्हणतात

तरी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्या ठिकाणी आपल्या विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या व हा रस्ता त्वरित वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. तसेच या ठिकाणी पार्किंग करिता P1- P2 पद्धत राबविण्यात यावी. व वाहतूक नियोजनाकरिता कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याचीही मागणी अल्पना वरपे यांनी केली आहे.