लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे मंगळवारी निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. सुरेश जाधव ७२ वर्षांचे होते आणि ते दीर्घकाळापासून आजाराने त्रस्त होते. मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. १९७९ पासून ते लस उत्पादक कंपनी सीरमशी जोडले गेले होते. ते उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रणाचे काम पाहत होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन आणि सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

अधिक वाचा  पंजाब सरकारला झटका! स्वतंत्र समितीमार्फत होणार पंतप्रधानांच्या सुरक्षेची चौकशी

“डॉ. सुरेश जाधव यांच्या निधनाने सीरम कुटुंबाने आणि भारतीय लस उद्योगाने एक मार्गदर्शक, आधारस्तंभ गमावला आहे. या कठीण काळात माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत,” असं ट्वीट करत पूनावाला यांनी शोक प्रकट केला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी देखील डॉ. जाधव यांना श्रद्धांजली वाहिली. “अतिशय दुःखद बातमी. लस विकासासाठी आयुष्यभर मोठं योगदान देऊन लोकांचे जीव वाचवले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” असं त्या म्हणाल्या.

या वर्षी मे महिन्यात, देशात करोना लसींचा तुटवडा जाणवत असताना, डॉ. जाधव यांनी आरोप केला होता की, सरकारने लसींचा उपलब्ध साठा आणि WHOने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे विचारात न घेता अनेक वयोगटातील लोकांना लस टोचायला सुरुवात केली.