पुणे : वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेतील वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यानच्या मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहे. जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमापासूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबरोबरच मेट्रो नक्की कोणामुळे सुरू झाली, यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवाद रंगणार आहे.

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा दोन मेट्रो मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. यातील वनाज ते रामवाडी मार्गातील वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या प्रवासी सेवेचे उद्घाटन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आग्रही आहेत. मेट्रोची चाचणी जुलै महिन्यात झाल्यानंतर मार्गाची कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना महापालिकेकडून महामेट्रोला करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रो प्रवासी सेवा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. तसे प्रयत्नही महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहेत.

अधिक वाचा  तेव्हा राणेंना अटक केली, आता पटोलेंना का नाही? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मेट्रोच्या प्रवासी सेवेचे उद्घाटन झाल्यानंतर निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने जानेवारी महिन्यात मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजित आहे. याच कार्यक्रमातून शहर विकासाचा मुद्दा उपस्थित करून निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ होईल.

राजकीय दावे

सन २००७ मध्ये महापालिकेने मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर मेट्रोचा प्रवास अडकला. मेट्रोचा प्रस्ताव मान्य करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. मात्र राजकीय वादातून हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. चार वर्षांपूर्वी पुण्यातील मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले आणि त्यानंतर पुढील तीन वर्षांत मेट्रोचे काम पुणेकरांना प्रत्यक्ष दिसले. मेट्रोच्या कामाला आपल्याच सत्ताकाळात आणि आपल्याच नेत्यांमुळे गती मिळाली, असा दावा सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झाला आहे.