पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेची आगामी निवडणूक येत्या काही महिन्यांत होत आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश पुण्यासह अन्य जेथे निवडणुका होणार आहेत, त्या महापालिकांना दिले आहेत.
हा आराखडा सादर करण्याची मुदत दि. 6 डिसेंबरपर्यंत आहे. महापालिकेने प्रभागांचा कच्चा आराखडा तयार केला आहे. सोमवारी तो राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हा आराखडा तयार करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद महापालिकेने आराखडा तयार करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी या महापालिकांनी केली होती. त्यानुसार आयोगाने 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.
दरम्यान, पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश केल्याने तसेच राज्य सरकारने लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढवल्याने सध्याचे प्रभाग फोडावे लागणार आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. चार सदस्यीय प्रभागातून निवडून आल्यानंतर आगामी निवडणुका तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना कशी होणार, त्यामध्ये आरक्षण कसे असेल, याविषयी विद्यमानांमध्ये धाकधूक आहे.
अधिक वाचा  उत्पल पर्रीकर अपक्ष लढण्यावर संजय राऊत म्हणाले – पणजीतील लढाई आता.....